बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे? 

By सोमनाथ खताळ | Published: March 21, 2024 11:39 AM2024-03-21T11:39:14+5:302024-03-21T11:40:37+5:30

बीड लोकसभेसाठी मविआकडून अजूनही उमेदवाराची प्रतिक्षा

Bajrang Sonavane joins NCP Sharad Pawar; Sonwane or Mete against Pankaja Munde for Beed Lok Sabha? | बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे? 

बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे? 

बीड : राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा येडेश्वरी उद्योग समुहाचे बजरंग सोनवणे यांनी बुधवारी सायंकाळी पुण्यात जावून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. सोनवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने पवार, मुंडे यांना मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीने अजूनही लोकसभेचा उमेदवार जाहिर केलेला नाही. त्यामुळे आता भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोण असणार? ही प्रतिक्षा अजूनही कायम आहे.

राष्ट्रवादीत फुट पडण्याआधी बजरंग सोनवणे हे जिल्हाध्यक्ष होते. २०१९ साली त्यांनी भाजपच्या डॉ.प्रीतम मुंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यावेळी त्यांनी पाच लाखांपेक्षा अधिक मतेही घेतली होती. परंतू पराभव झाल्यानंतर ते फारसे सक्रीय झाले नाहीत. त्यातच त्यांचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यामुळे ते केज वगळता फारसे जिल्ह्यात सक्रीय दिसले नाहीत. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी झाल्या. त्यात बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्यासोबत राहिले. परंतू इकडे त्यांची घुसमट होत असल्याने ते नाराज होते. मागील आठवड्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. खा.शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चाही झाली होती. अखेर बुधवारी यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे जिल्ह्यात शरद पवार गटाला बळ मिळणार असल्याचे दिसते.

शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. महाविकास आघाडीकडून बीडची जागा शरद पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी बजरंग सोनवणे, डॉ.ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू हाेती. बुधवारी सोनवणे यांनी पक्षात प्रवेश केला, परंतू डॉ.मेटे यांच्याबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही. बुधवारीच पुण्यात खा.पवार यांच्यासोबत शिवसंग्रामच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. याला मेटे उपस्थित नव्हत्या, परंतू उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मेटे यांनी आपल्या निबंधक पदाचा राजिनामा दिल्याने त्यांचा कार्यालयात निरोप समारंभ होता, त्यामुळे त्या बैठकीला हजर नव्हत्या, असे सूत्रांनी सांगितले. परंतू याला अधिकृत दुजाेरा मिळाला नाही.

सोनवणे की मेटे?
बजरंग सोनवणे यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवलेली असल्याने त्यांच्याकडे अनुभव आहे. तर मराठा आरक्षणासाठी दिवंगत विनायकराव मेटे यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी लोकसभा लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वीच बैठक घेऊन धरला होता. त्यामुळे उमेदवारीच्या रेसमध्ये मेटे देखील आहेत. या दोघांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा आहे. यावर शिक्कामोर्तब कधी होते? की ऐनवेळी खा.पवार नवा डाव टाकून दुसराच उमेदवार देणार? याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Bajrang Sonavane joins NCP Sharad Pawar; Sonwane or Mete against Pankaja Munde for Beed Lok Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.