अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी

By सोमनाथ खताळ | Published: April 10, 2024 05:02 PM2024-04-10T17:02:36+5:302024-04-10T17:05:48+5:30

गुन्हेगारी वस्त्यांची झडती, वाहनांचीही तपासणी

'All Out Operation' by Beed Police on New Moon Night; Nakabandi at 26 places | अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी

अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी

बीड : लोकसभा निवडणूक अनुषंगाने जिल्हा पोलिस दलाने सोमवारी अमावास्येच्या रात्री 'ऑल आऊट ऑपरेशन' राबविले. यात जिल्ह्यात २६ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. शिवाय गुन्हेगारी वस्त्यांचीही झडती घेण्यात आली. यात एका कुख्यात गुन्हेगारासह पाहिजे आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. स्वत: पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अडीचशेपेक्षा जास्त पोलिस अधिकारी, कर्मचारी सात तास रस्त्यावर होते.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्या अगोदरचे सर्व नियोजन आणि उपाययोजना जिल्हा प्रशासन व पोलिस दलाकडून केल्या जात आहेत. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी अमावास्येच्या रात्री ११ ते पहाटे ६ असे सात तास पोलिसांनी 'ऑल आऊट ऑपरेशन' राबविले. यात हॉटेल, लॉजसह गुन्हेगारी वस्त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच २६ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार आदींनी यात सहभाग घेतला होता.

एकावर एमपीडीए कारवाई
परळी तालुक्यातील पोहनेर येथील अशोक ज्ञानोबा गायकवाड (वय ४८) हा हातभट्टी दारू तयार करून ती विक्री करतो. त्याच्याविरोधात ७ विविध गुन्हे दाखल आहेत. हाच धागा पकडून सिरसाळा पोलिसांनी त्याचा एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी याला मंजुरी देत कारवाईचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी रात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला पकडून छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.

९० जणांना बजावले समन्स
जिल्ह्यातील ९० जणांना समन्स बजावण्यात आले. यासोबतच ३५ जणांना बेलेबल वॉरंट तर २३ जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावले आहे.

१४६ वाहनांवर दंडात्मक कारवाई
या ऑपरेशनमध्ये १ हजार २४७ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत ४६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १३ गुन्हेगारही तपासण्यात आले.

एक तडीपार आरोपीही पकडला
बीड शहरातील पेठबीड हद्दीतील एका आरोपीला तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो शहरात फिरत होता. याच ऑपरेशनमध्ये पोलिसांना तो दिसला. त्याला पकडून पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन करत गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ६ वाजेपर्यंत 'ऑल आऊट ऑपरेशन' राबविण्यात आले. यात वाहनांची तपासणी करण्यासह गुन्हेगारी वस्त्या, हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. लोकसभा निवडणूक अनुषंगाने अशाप्रकारच्या ऑपरेशन आणि कारवाया यापुढेही करत राहू.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

Web Title: 'All Out Operation' by Beed Police on New Moon Night; Nakabandi at 26 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.