पहिले यश ! वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 08:41 PM2019-05-24T20:41:18+5:302019-05-24T20:43:55+5:30

आंबेडकरी अनुयायांचा जलील यांना भक्कम पाठिंबा

First success! Success of Vanchit Bahujan Aaghadi | पहिले यश ! वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी

पहिले यश ! वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी

googlenewsNext

औरंगाबाद : मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत किरकोळ आघाडी राखलेल्या वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शेवटी शिवसेनेचा गड पाडला. वंचित बहुजन आघाडीला राज्यात मिळालेले हे एकमेव यश. गेल्या आठ महिन्यांपासून शहरात झपाटल्यागत नि:स्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तळमळीचे हे यश आहे. 

औरंगाबाद हे तसे आंबेडकरी चळवळीचे केंद्र. कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर शहरात उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर येथे आंबेडकरी चळवळ, विचारधारेतील राजकीय कार्यकर्ते व अनुयायांच्या ध्रुवीकरणास वेग आला होता. या वेगाला बळ व गती दिली ती अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्या गत वर्षी नोव्हेंबरमध्ये जबिंदा मैदानावर झालेल्या टोलेजंग सभेने. या सभेपासूनच वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विलक्षण उत्साह संचारलेला होता. तो उत्साह व विश्वास कार्यकर्त्यांनी विजयात परावर्तित करेपर्यंत कायम राखला, हे विशेष. 

लोकसभेचे पडघम वाजू लागले, तसे वंचित आघाडी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह जनतेनेही व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून प्रचाराची राळ उठविली होती. अ‍ॅड. आंबेडकर व बॅ. ओवेसी यांच्या प्रचंड गर्दी खेचणाऱ्या संयुक्त सभा राज्यभरात झाल्या. या सभा व वेळोवेळी होणाऱ्या निर्णयाची सकारात्मक प्रसिद्धी या समाजमाध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे करून जनमत आपल्या बाजूने जोडण्याचे काम केले.
 सोबतच गेली चार टर्म औरंगाबादचे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांना विकासकामे करण्यात आलेले अपयश, शहराच्या झालेल्या दुर्दशेच्या पोस्टही फिरवून मतदारांत रोष निर्माण करण्यातही ही मंडळी अग्रेसर होती. 
वंचित आघाडीचा उमेदवार निवडीतून झालेला संभ्रम दूर करीत आ. इम्तियाज जलील यांचा नवा व समंजस चेहरा घराघरांत पोहोचविण्याचे कामही याच नेटकरी मंडळीने लीलया पार पाडले. 

कमावलेला विश्वास व मत हस्तांतरण
मुस्लिम व आंबेडकरी अनुयायी या निवडणुकीत एकत्र आले. त्यांनी जलील यांना भक्कम पाठिंबा दिला. दोन्ही समाजांनी एकमेकांविषयी यानिमित्ताने कमालीचा विश्वास निर्माण केल्याचे दिसले. तो शेवटपर्यंत टिकला.
 जलील यांची उमेदवारी दाखल करताना निघालेल्या रॅलीने या दोन्ही समाजाच्या ऐक्याचे संकेत दिले होते. आंबेडकरी अनुयायांची मते मुस्लिम उमेदवाराला हस्तांतरित होतील का, अशी उपस्थित केली जाणारी शंकाही यानिमित्ताने फोल ठरली आहे. 

मतदारांना अपील करणारा चेहरा
आ. इम्तियाज जलील यांचा सर्वसमावेशक चेहराही मतदारांना अपील करणारा ठरला. आ. जलील यांनी वेळोवेळी घेतलेली समंजस भूमिकाही शहरातील संभाव्य तणाव निवळण्याच कारणीभूत ठरली. त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघातून व समाजातील बहुतांश सर्वच स्तरांतून जलील यांना काहीना काही मतदान मिळाले. खैरे यांच्याविरुद्ध तयार झालेले जनमत व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा फॅक्टरचा खुबीने वापर करून केलेल्या मतविभाजनाने इम्तियाज जलील यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त केला, हे खरेच.  

प्रत्येकाने जमेल तसा प्रचार केला

श्रमिक, कामगार वसाहतींमधून इम्तियाज जलील यांना मतदान करण्यात आले. त्यापूर्वी आर्थिक मदतही करण्यात आली. प्रत्यक्ष उमेदवार किंवा कुणी नेता वसाहतीत येण्याची वाट कुणीच पाहिली नाही. प्रत्येकाने जमेल तसा प्रचार केला. विशेषत: घराघरांतून, नातेवाईकांना भेटून आपला उमेदवार व त्याची निशाणी आवर्जून सांगण्यात येत होती. आंबेडकरी अनुयायी व मुस्लिम वसाहतींमधून मतदानाच्या दिवशी प्रचंड उत्साह होता. या दोन्ही समाजांनी भरभरून व उत्स्फूर्त मतदान केले. त्यांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीने निसटता विजय इम्तियाज जलील यांना नोंदविता आला. 

Web Title: First success! Success of Vanchit Bahujan Aaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.