Lok Sabha Election 2019; Crores of flights, shown as 18 million | Lok Sabha Election 2019; उड्डाणे कोटींची, दाखविले १८ लाख

Lok Sabha Election 2019; उड्डाणे कोटींची, दाखविले १८ लाख

ठळक मुद्देनिवडणूक खर्च विभागाचा आक्षेप : ताळमेळ साधावा लागणार

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला अन् यावर इलेक्शन एक्सपेंडिचर टीमच्या पाच पथकांचे निरीक्षण सुरू झाले. या २१ दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी प्रचारात कोटीची उड्डाणे केलीत; खर्च मात्र सर्वाधिक १८ लाखांपर्य$ंतच दाखविण्यात आला. निवडणूक खर्च विभागाद्वारे पडताळणी केली असता, उमेदवारांचा खर्च किमान ६५ लाखांपर्यत जात असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. अशा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघात प्रमुख उमेदवारांद्वारे अखेरच्या दोन दिवसांत म्हणजेच २५ व २६ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या तारखेपासून प्रचाराची मुदत संपण्याच्या म्हणजे, १६ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘तिसरा’ डोळा होता. या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाला सादर केलेला खर्च व उमेदवारांच्या प्रचारावर एफएस, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी व अकाऊंटिंग टीमद्वारे उमेदवारांच्या प्रचारावर नजर ठेवण्यात आली. उमेदवरांनी निवडणूक खर्च विभागाद्वारे सादर केलेल्या खर्चाची निवडणूक खर्च विभागाद्वारे पडताळणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, पडताळणीसाठी आयोगाद्वारे बसंत घडीवाल हे आॅब्झर्व्हर अमरावती येथे मुक्कामी होते. त्यांच्या निर्देशानुसार झालेल्या तपासणीत प्रमुख चार उमेदवारांनी निवडणूक खर्च कमी दाखविला असल्याचे आढळून आले. या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती या विभागाने दिली.
निवडणूक खर्च विभागाला १६ एप्रिलपर्यंत दाखविण्यात आलेल्या खर्चानुसार, महायुतीचे आनंदराव अडसूळ यांनी १७ लाख ६३ हजार ५०४, महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांनी १४ लाख ५७ हजार ५६०, वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी ३ लाख ६२ हजार ५१३ व बसपाचे अरुण वानखडे यांनी ११ लाख ४८ हजार १०० रूपयांचा खर्च निवडणूक खर्च विभागाकडे सादर केलेला आहे. यापेक्षा कित्येक पटीने खर्च कमी दाखविल्याचा आक्षेप निवडणूक खर्च विभागाने नोंदविला व उमेदवारांना खर्चाची पडताळणी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी रवींद्रकुमार लिंगनवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

निवडणूक खर्चाचे आॅब्झर्व्हर २५ दिवसांनी येणार
उमेदवारांनी प्रचार बंद होण्यापूर्वीपर्यंत १६ एप्रिलपर्यंतचा खर्च निवडणूक खर्च विभागाला सादर केला आहे. या खर्चाची पडताळणी निवडणूक विभागाद्वारे आयोगाचे आॅब्झर्व्हर व राजस्थानमधील जीएसटीचे उपायुक्त बसंत घडीवाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. अधिकचा खर्च कसा झाला, याचा ताळमेळ उमेदवार व खर्च निरीक्षक यांच्यातील बैठकीनंतर होणार आहे. मतदानाच्या २५ दिवसानंतर पुन्हा आयोगाचे निरीक्षक अमरावतीला दाखल होतील. त्यावेळी पुन्हा उमेदवारांसोबत खर्चाचा ताळमेळ साधला जाणार असल्याचे लिंगनवाड यांनी सांगितले.

विजयी रॅलीचा द्यावा लागणार हिशेब
लोकसभा निवडणुकीत उमेदवार विजयी झाल्यानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी रॅलीचा हिशेब निवडणूक खर्चात मोडणार असल्याचे लिंगनवाड यांनी सांगितले. मात्र, याबाबत जिल्हा निवडणूक विभागात दोन मतप्रवाह आहेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्या मते, आयोगाने विजयी उमेदवारास दिलेल्या प्रमाणपत्रानुसार काढण्यात येणाºया विजयी रॅलीचा हिशेब द्यावा लागणार नाही. मात्र, प्रमाणपत्रापूर्वी अशी रॅली काढल्यास हा खर्च उमेदवाराच्या खात्यात जमा होणार आहे.

असा साधणार खर्चाचा ताळमेळ
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपयांची खर्चमर्यादा आहे. त्याअनुषंगाने उमेदवार खर्च सादर करतात. मात्र, एफएस, एसएसटी, व्हीएसटी व व्हीव्हीटी टीमदेखील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करत असते व त्या अनुषंगाने निवडणूक दरपत्रकाद्वारे हा खर्च उमेदवारांच्या नावाने जमा करण्यात येतो. या खर्चामध्ये तफावत असल्याने आता उमेदवार व टीम यांच्या समोरासमोर चर्चा होऊन ताळमेळ साधला जाणार आहे. निवडणूक निरीक्षक आल्यानंतरही यासाठी उमेदवारांची बैठक बोलाविली जाणार आहे.

उमेदवारांनी १६ एप्रिलपर्यंत सादर खर्चाची टीमद्वारे पडताळणी करण्यात येत आहे. दोन उमेदवारांचा खर्च ६० ते ६५ लाखांपर्यंत आहे. यासह चार उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली. उमेदवारांसोबतच्या बैठकीत ताळमेळ साधण्यात येईल.
- रवींद्रकुमार लिंगनवाड
नोडल अधिकारी, निवडणूक खर्च

Web Title: Lok Sabha Election 2019; Crores of flights, shown as 18 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.