पालकमंत्री 'इन ॲक्शन'; भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे केले निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:55 IST2026-01-12T15:54:22+5:302026-01-12T15:55:24+5:30
Amravati : डॉ. नितीन धांडे यांच्याकडून कार्यवाहीचे पत्र, मनपा निवडणुकीत उमेदवारी

Guardian Minister 'in action'; 15 rebel BJP office bearers suspended
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजपचे सदस्य असताना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात महापालिका निवडणुकीत उघडपणे बंडखोरी केल्याप्रकरणी १५ पदाधिकाऱ्यांचे निलंबित करण्यात आले आहे. ही कार्यवाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी केली आहे. निलंबनाबाबतचे पत्र जारी केले आहे.
डॉ. नितीन धांडे यांच्या पत्रानुसार बंडखोरांनी पक्षाच्या निर्णयांना आव्हान दिले आहे. तसेच पक्षाच्या हिताच्या विरुद्ध कारवाया केल्याचे गंभीर प्रकार निदर्शनास आले, ही कृत्य भाजप संविधानातील पक्षशिस्त निष्ठा व संघटनात्मक मूल्यांचा अपमान करणारी असल्याने अशा पक्षाविरोधी वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. भाजपच्या १५ पदाधिकाऱ्यांनी बंडाळी करून इतर पक्षातून अमरावती महापालिका निवडणुकीत उमेदवार दाखल केली आहे. अशा या भाजपच्या बंडखोरांवर कार्यवाहीची गाज कोसळली.
पालकमंत्र्यांची 'वन टू वन' चर्चा
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये चार निवडणूक सभा घेतल्या. यासोबतच येथील एका आलिशान हॉटेलमध्ये रविवार, ११ जानेवारीला उशिरा रात्री पदाधिकाऱ्यांसह निवडणुकीबाबत चिंतन केले. रात्री १२ ते सुमारे ३ वाजेपर्यंत पालकमंत्री बावनकुळे यांनी रिंगणातील भाजप उमेदवारांशी निवडणूक संदर्भात 'वन टू वन' संदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच निवडणुकीत विजयासाठी अंतिम क्षणी कशाप्रकारे प्रचार करायचा, याविषयी मंत्री बावनकुळे यांनी काही टिप्स उमेदवारांना दिल्या. यावेळी महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, आदी भाजपचे नेते उपस्थित होते.
या बंडखोरांवर झाली निलंबनाची कार्यवाही
भाजपविरोधात युवा स्वाभिमान, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले विवेक चुटके, ज्योती वैद्य, गौरी मेघवानी, किशोर जाधव, अनिषा मनीष चौबे, सचिन पाटील, संजय वानरे, सतीश करेसिया, शिल्पा पाचघरे, दीपक गिरोळकर, योगेश वानखडे, मेघा हिंगासपुरे, संजय कटारिया, रश्मी नावंदर, धनराज चक्रे या भाजप पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांचा दुसरा 'मास्टर स्ट्रोक'
पालकमंत्री बावनकुळे यांनी भाजपशी युवा स्वाभिमान पक्षाने युती धर्माचे पालन केले नसल्याने शनिवारी आ. रवी राणा यांच्याशी मनपात युती तोडण्याचा निर्णय घेत 'त्या' सहा जागेवर भाजपने चक्क अपक्ष उमेवारांना समर्थन जाहीर केले. तर, रविवारी पालकमंत्र्यांच्या आदेशाने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाळी करणाऱ्या १५ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. सलग दोन दिवसांत पालकमंत्र्यांच्या 'इन अॅक्शन'ची राजकारणात चर्चा होत आहे.