बेरोजगारांना गंडविणारी टोळी जेरबंद, 10 लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:07 PM2019-09-30T22:07:47+5:302019-09-30T22:07:50+5:30

नोकरीचे आमिष : दहा लाख ४० हजाराने केली फसवणूक

cheating 10 lakhs of unemployment in amravati, police arrested accused | बेरोजगारांना गंडविणारी टोळी जेरबंद, 10 लाखांची फसवणूक 

बेरोजगारांना गंडविणारी टोळी जेरबंद, 10 लाखांची फसवणूक 

googlenewsNext

यवतमाळ : सर्वसाधारण कुटुंबातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष देऊन आर्थिक फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीने आतापर्यंत २२ लाखांवर रक्कम उकळल्याचे सांगण्यात येते. अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. 

वैभव देशमुख, अंकुश कावलकर दोघे रा. अमरावती, रमेश गिरी रा. मादनी ता. आर्वी जि. वर्धा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी उत्तम रामचरण इंगोले रा. दिग्रस यांचा मुलगा कुशल याला भारतीय स्टेट बँक मानकापूर नागपूर येथे नियुक्ती झाल्याच्या आदेशाची प्रत दिली. कुशल इंगोले तो नियुक्ती आदेश घेऊन बँकेत गेला असता अशी कुठल्याही प्रकारची नियुक्ती बँकेकडून झाली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच तो नियुक्ती आदेश खोटा असल्याचेही स्टेट बँकेच्या मानकापूर शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उत्तम इंगोले यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली. या आरोपींनी नरेश पंढरीनाथ निमजे रा. समतानगर वडगाव यांचा मुलगा विशाल, कांता दयाराम पाढेण रा. सह्यांद्री सोसायटी यांची मुलगी प्रांजली या दोघांना वन विभागात कायमस्वरूपी नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळल्याचे चौकशीत पुढे आले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात उत्तम इंगोले यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत व त्यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या आरोपींकडून विदर्भातील इतरही शहरातील बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अशी केली जाते फसवणूक 
साधारणत: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरातील बेरोजगारांना हेरून त्यांच्याशी संबंध निर्माण केले जाते. विश्वास संपादन केल्यानंतर अगदी कौटुंबिक सदस्य असल्याचे भासवून हे भामटे नोकरीचे आमिष दाखवितात व पैसे उकळतात. अनेकांना खोटे नियुक्ती आदेश देऊन गंडविले आहे. अमरावती जिल्ह्यात या टोळीवर असे गुन्हे दाखल आहेत. इतर कुणाची फसवणूक झाल्याचे आढळल्यास त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: cheating 10 lakhs of unemployment in amravati, police arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.