बच्चू कडूंचा खळबळजनक गौप्यस्फोट: भाजपचा नेता प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 05:27 PM2024-03-24T17:27:50+5:302024-03-24T17:31:40+5:30

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही आक्रमक भूमिका घेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं सांगत भाजपविरोधात रणशिंग फुंकलं आहे.

BJP leader will enter Prahar and fight from Amravati lok sabha seat says Bachhu Kadu | बच्चू कडूंचा खळबळजनक गौप्यस्फोट: भाजपचा नेता प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून लढणार!

बच्चू कडूंचा खळबळजनक गौप्यस्फोट: भाजपचा नेता प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून लढणार!

Bacchu Kadu ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. काही मतदारसंघांमध्ये तिकिटाच्या आशेने नेत्यांचे पक्षांतर सुरू असून काही जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्ष होताना दिसत आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही आक्रमक भूमिका घेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं सांगत भाजपविरोधात रणशिंग फुंकलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा अहेर देत अमरावतीतून प्रहारचाही उमेदवार मैदानात उतरेल, अशी घोषणा केली आहे. 

"मतदारसंघात आमची ताकद असतानाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. उलट महायुतीच्या संभाव्य उमेदवाराकडून आमच्याच कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही या जागेवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक चांगला उमदेवार मिळाला असून ६ एप्रिल रोजी आम्ही या उमेदवाराची घोषणा करू. हा उमेदवार भाजपमधीलच आहे," असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.

एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत अपक्ष उमेदवारीची घोषणा केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडलेली असतानाच आता अमरावती लोकसभा मतदारसंघातही बच्चू कडू यांनी भाजपविरोधात आपला उमेदवार उतरवण्याचं निश्चित केल्याने महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे.

दरम्यान, नवनीत राणा या मागच्या निवडणुकीत अमरावतीतून राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होत्या. तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र यंदा महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता असून नवनीत राणा याच भाजपच्या उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राणा यांच्यासोबत असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना महायुतीविरोधात भूमिका घेत मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Web Title: BJP leader will enter Prahar and fight from Amravati lok sabha seat says Bachhu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.