महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:07 IST2026-01-13T15:06:12+5:302026-01-13T15:07:58+5:30
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणूक यावेळी रंगतदार होताना दिसत आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणत्या पक्षाला यश मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.

महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
Municipal election 2026: अकोला महापालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला एक दिवस शिल्लक आहे. असे असतानाही अकोल्यात शिंदेसेना आणि उद्धवसेनाचा प्रचार अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरलेला नाही. प्रचारातील विस्कळीतपणा, प्रमुख नेत्यांचे अल्प लक्ष आणि स्थानिक नेत्यांमधील आपसातील हेवेदावे यामुळे या दोन्ही पक्षांना महापालिका निवडणुकीत दुहेरी आकडा गाठणे कठीण असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सध्याच्या स्थितीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे दोनच पक्ष दुहेरी आकडा गाठू शकतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे; मात्र ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा धोका लक्षात घेता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीलाही दुहेरी आकडा गाठणे अवघड ठरण्याची शक्यता आहे.
अकोला महापालिका निवडणूक प्रचारात शिंदेसेनेला अपेक्षित आघाडी घेता आलेली नाही. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत महायुती न झाल्याने उमेदवार निश्चितीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात संभ्रमाचे वातावरण होते.
काही माजी नगरसेवकांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याचे दिसून आले. उद्धवसेनेची स्थितीही काहीशी याचप्रमाणे होती. अनेक प्रभागांतील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारत थेट उद्धवसेनेविरोधात निवडणूक रिंगणात उडी घेतली.
शिंदेंची केवळ एक सभा
शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ७ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोला शहरात एक जाहीर सभा झाली. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राज्यस्तरावरील कोणताही प्रमुख नेता अकोल्यात प्रचारासाठी फिरकला नाही. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रचार संपण्यास एक दिवस शिल्लक असताना काही सभा घेतल्या.
उद्धवसेनेचे नेते फिरकलेच नाही, काँग्रेसलाही जाणवली उणीव
उद्धवसेनेचा राज्यस्तरावरील एकही प्रमुख नेता अकोल्यात प्रचारासाठी आला नाही. काँग्रेसकडूनही माजी मंत्री विजय वडेट्टीवार वगळता अन्य कोणत्याही प्रमुख नेत्याची जाहीर सभा झाली नाही. ही उणीव काँग्रेस उमेदवारांना जाणवली. एकीकडे एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी अकोल्यात दोन सभा घेतल्या असताना, काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांचे प्रचाराकडे झालेले दुर्लक्ष काँग्रेसच्या मतांवर परिणाम होऊ शकतो.
'वंचित'चा घसरता आलेख
वंचित बहुजन आघाडीची महापालिका निवडणुकीतील कामगिरी प्रत्येक निवडणुकीत घसरली आहे. या पक्षाला २०१२ च्या निवडणुकीत ७ जागा मिळाल्या होत्या. आरक्षणाचा लाभमिळाल्याने त्यांचा महापौरही झाला. असे असतानाही २०१७ च्या निवडणुकीत त्यांचे तीनच नगरसेवक निवडून आलेत. यावेळीही प्रचारात प्रकाश आंबेडकर यांनी शेवटच्या टप्प्यात सहभाग घेतला आहे.