लढतीचे चित्र स्पष्ट, निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान झाले सज्ज! राजकीय पक्षांचे ३६७, तर अपक्ष १०२ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:32 IST2026-01-04T13:31:16+5:302026-01-04T13:32:16+5:30
Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत गोंधळ होता. आता तो दूर झाला आहे.

लढतीचे चित्र स्पष्ट, निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान झाले सज्ज! राजकीय पक्षांचे ३६७, तर अपक्ष १०२ उमेदवार रिंगणात
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी (३ जानेवारी) राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने अपक्ष उमेदवारांना विविध निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यासोबतच निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, आता महापालिकेच्या आखाड्यातील पैलवान राजकीय कुस्ती लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. शनिवारपासून प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे.
महापालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे ३६७ आणि अपक्ष म्हणून १०२ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत महिला राखीव असलेल्या ४० जागांवर १९९ महिला उमेदवार नशीब अजमावत आहेत. तर २७० पुरुष उमेदवार आहेत.
हे प्रमाण पाहता एका जागेसाठी सरासरी पाच महिला रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण असलेल्या जागांवर सरासरी ७ पुरुष उमेदवार आहेत. राजकीय पक्षांच्या जागावाटपाकडे पाहता, भारतीय जनता पक्षाने ६२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपने महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) साठी १४ जागा सोडल्या आहेत. शिंदेसेना सर्वाधिक ७२ जागांवर निवडणूक लढवत असून, काँग्रेसने ५५ जागांवर उमेदवार दिले आहेत.
सर्वच पक्षांनी केली जोरदार तयारी
काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार) ला २४ जागा दिल्या आहेत. उद्धवसेनाही ५५ जागांवर निवडणूक लढवत असून, काही प्रभागांमध्ये आघाडी धर्म पाळत काँग्रेसविरोधात उमेदवार दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे काँग्रेसनेही काही ठिकाणी उद्धवसेनेविरोधात उमेदवार दिलेले नाहीत.
एमआयएम पक्षानेसुद्धा ३७ उमेदवारांना संधी देत, काँग्रेससमोर मतविभाजनाचे आव्हान निर्माण केले आहे. राजकीय समीकरणांचा विचार करता, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती आहे.
काँग्रेस, उद्धवसेना, शिंदेसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत कोणता पक्ष किती जागांवर मजल मारतो, याचे चित्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत.