जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:51 IST2025-12-29T12:49:11+5:302025-12-29T12:51:09+5:30
Akola Municipal Election News Marathi: काँग्रेस आणि उद्धवसेना ५० जागा लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाबाबत उद्धवसेनेसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Akola Municipal ELection 2026: भाजप आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रविवारी दुपारी भाजप कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रामुख्याने जागावाटपावर चर्चा झाली; मात्र अपेक्षित तोडगा न निघाल्याने जागावाटपाचे घोडे अद्याप अडलेलेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप व शिंदेसेनेच्या प्रमुख नेत्यांनी भूमिका मांडल्या. काही प्रभागांवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असून, बैठकीत केवळ चर्चा आणि पर्यायांवर विचारमंथन झाले. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही ठोस निर्णयावर शिक्कामोर्तब झाले नसल्याने महायुतीतील अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
आणखी भाजपकडून राष्ट्रवादी (अजित पवार) सोबतही समांतर वाटाघाटी सुरू आहेत. या युतीतही केवळ एका जागेवरून अडचण असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) ने पुरुष उमेदवार देण्याचा आग्रह धरला असून, भाजपकडून त्या जागेवर महिला उमेदवार देण्याची अट पुढे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीला महिला उमेदवाराची अट!
महिला उमेदवार देण्याच्या भाजपच्या अटीवरून ही युती अडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने महायुतीतील अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर येत आहे. बैठका, चर्चा आणि वाटाघाटींच्या फैरी सुरू असल्या तरी प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हा गोंधळ लवकर सुटावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकूणच, महायुतीत सध्या चर्चा अधिक आणि निर्णय कमी, अशीच स्थिती असून, जागावाटपाचे घोडे अजूनही जागच्या जागीच अडलेले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काँग्रेस, उद्धवसेना म्हणतेय आम्ही ५० जागा लढू
अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांत आघाडी झाल्याचा दावा अकोला पश्चिमचे आमदार साजीद खान पठाण, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी रविवारी केला; परंतु कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा आल्या, हे अद्यापही त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
काँग्रेस आणि उद्धवसेना ५० जागा लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाबाबत उद्धवसेनेसोबत सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीनही पक्षांची आघाडी अधांतरी असल्याचे चित्र आहे.
रविवारी सायंकाळी संयुक्त बैठकीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ व प्रमुख नेते आमदार साजिद खान पठान, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झिशान हुसेन, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, पक्षाचे समन्वयक प्रकाश तायडे, राष्ट्रवादी (शरद पवार) चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगर अध्यक्ष रफीक सिद्दिकी, प्रदेश संघटन सचिव जावेद झकरिया, कार्याध्यक्ष सैयद युसूफ अली आणि देवेंद्र ताले उपस्थित होते.
तोडग्याची शक्यता
काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) त आघाडी जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात असले तरी, या दोन्ही पक्षांत जागा वाटपाबाबत अनिश्चितता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीत दोन प्रभागांतील जागांवर वाद आहे. त्या प्रभागावर लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली आहे.