प्रचार थांबवल्यावर समाजमाध्यमावर पोस्ट केल्यास बसणार दणका, निवडणूक आयोग करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:49 IST2026-01-13T15:47:25+5:302026-01-13T15:49:22+5:30
अकोला महापालिका निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकीवर लक्ष केले होते. तर काही पक्षांचे प्रमुख शहरात आलेच नाही.

प्रचार थांबवल्यावर समाजमाध्यमावर पोस्ट केल्यास बसणार दणका, निवडणूक आयोग करणार कारवाई
अकोला महापालिका निवडणुकीसाठी गेल्या ११ दिवसांपासून प्रचारतोफांचा भडीमार सुरू आहे. प्रचार थांबल्यानंतर पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांशी थेट संपर्कातून प्रचार केला जाणार आहे. मात्र, कोणत्याही समाजमाध्यमावर पोस्ट व्हायरल करून प्रचार केल्यास आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांना सावध राहावे लागणार आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी ३ जानेवारीपासून सुरू झाली. या काळात सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्स, ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून मतदारांना त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांसह नेत्यांच्या सभाही झाल्या. त्या सभांमध्ये दिसलेली गर्दी आता मतदानात परावर्तित होते काय, याची स्पष्टता १६ जानेवारी रोजी मतदान यंत्रातून पुढे येणार आहे.
शिंदेसेनेची एकच सभा
शिंदेसेनेचे ६४ उमेदवार असताना या पक्षाची केवळ एकच प्रचारसभा झाली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांसमोर पक्षाची भूमिका मांडली. तर मंत्री संजय राठोड यांनीही शहरात तळ ठोकून प्रचार केला. मात्र, पक्षाची पाहिजे तशी हवा झाली नसल्याचे चित्र दिसून आले.
उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते दूरच
उद्धवसेनेतर्फे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीतील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचारासाठी अकोल्यात हजेरी लावलेली नाही. राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारांचा प्रचार केला.
एमआयएमचे ओवैसी यांची दोनदा भेट
एआयएमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या दिवशीच जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी शहरात दुसऱ्यांदा भेट दिली. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएमने चांगलीच तयारी केल्याची चर्चा आहे.
वंचितच्या अखेरच्या टप्प्यात सभा
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी १२ जानेवारी रोजी एकाच दिवशी तीन सभा घेत प्रचार केला. त्यापूर्वी सुजात आंबेडकर यांनी संपूर्ण शहर पिंजून काढत उमेदवारांचा प्रचार केला.
काँग्रेस प्रचारातही मागे
काँग्रेस पक्षाच्या केवळ दोनच सभा झाल्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खा. इम्रान प्रतापगढी यांनी काँग्रेसची प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांच्या सभाही विशिष्ट भागांतच झाल्या. त्यामुळे त्यांची परिणामकारकता किती आहे, हेही निकालातून स्पष्ट होणार आहे.