महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:51 IST2025-12-26T11:48:19+5:302025-12-26T11:51:34+5:30
Akola Municipal ELection: अकोला महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी आघाडी आणि जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही.

महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता!
- नितीन गव्हाळे, अकोला
अकोला महापालिका निवडणुकीत यावेळी थेट लढतीऐवजी त्रिकोणी किंवा चौरंगी लढतीचे चित्र दिसू लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने 'एकला चलो रे'ची भूमिका घेत पहिली उमेदवार यादी जाहीर केल्याने काँग्रेस-वंचित संभाव्य आघाडी फिसकटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचा थेट परिणाम काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे होणारे मतांचे विभाजन भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडू शकते.
नगरपरिषद निवडणुकांमध्ये एमआयएमचे सात नगरसेवक निवडून आल्याने त्या पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून, निवडक प्रभागांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याची केली जात आहे. काँग्रेसचा प्रभाव असलेल्या प्रभागांत लक्ष केंद्रित करून १२ ते १५ प्रभागांमध्ये चारही उमेदवारांचे पॅनल उभे करण्याचा 'एमआयएम'चा विचार सुरू आहे.
प्रत्यक्षात तसे झाल्यास काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊ शकते. त्यातच वंचितची स्वतंत्र भूमिका काँग्रेससाठी धोक्याची मानली जात आहे. वंचितचा 'एकला चलो रे' चा निर्णय टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यामुळे काँग्रेसला सावध पावले उचलण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बोलत आहेत.
काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या!
दुसरीकडे सध्या काँग्रेसची भिस्त मोजक्या चेहऱ्यांवर असून, आमदार साजिद खान पठाण यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. वंचित, एमआयएमचा प्रभाव काँग्रेसच्या परंपरागत मतपेढीवर होऊ नये, यासाठी आमदार पठाण आणि माजी नगरसेवक डॉ. झिशान हुसैन महापालिका निवडणुकीत कोणती रणनीती आखतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपची स्थिर मतपेढी आणि संघटनशक्ती
अकोला महापालिकेवर यापूर्वी तीन वेळा भाजपचा झेंडा फडकला असून, शहरावर पक्षाची पकड अजूनही मजबूत आहे. संघटन, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची फौज या तिन्ही बाबतींत भाजप आघाडीवर असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
इतरांचे तळ्यात मळ्यात, भाजप मात्र सज्ज!
भाजपसमोर ठोस आव्हान उभे करायचे असल्यास काँग्रेसला मित्रपक्षांची साथ अपरिहार्य असल्याची चर्चा सुरू आहे. 'एकला चलो रे'ची भूमिका काँग्रेससाठी धोक्याची ठरू शकते, असा मतप्रवाह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, उद्धवसेनेच्या सोबतीला मनसे आल्याने नव्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने अद्यापही पत्ते उघड न केल्याने संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.