महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:29 IST2025-12-27T12:26:18+5:302025-12-27T12:29:46+5:30
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढणार असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मात्र, जागावरून आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदेसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र लढणार असल्याचा निर्णय झाला आहे. पण, निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात भाजपानेराष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) अकोला महापालिकेत १०-१५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करून ताकद दाखवून द्यावी लागेल, असा इशारा मिटकरींनी दिला. आहे.
अकोला महापालिकेच्या ८० जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे. पण, कुणाला किती जागा, हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यातच भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) १०-१५ जागांचा प्रस्ताव दिला गेल्याची माहिती आहे. याच प्रस्तावावरून आमदार अमोल मिटकरी भाजपावर भडकले.
मिटकरी म्हणाले, 'मान, सन्मान देऊ नका, पण..."
अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट केली आहे. मिटकरी म्हणाले, "तुमचा मान, सन्मान नकाच देऊ. परंतू, अपमानही सहन कसा करायचा?", असा सवाल मिटकरींनी केला आहे.
"१०-१५ जागांवर बोळवण करून राष्ट्रवादी पक्षाला ग्राह्य धरत नसाल तर अकोल्यात 'मैत्रीपूर्ण' ताकद दाखवत प्रेमाने लढावे लागेल. पक्षातील जिल्ह्यातील नेत्यांचं माहीत नाही, पण तळागाळातील सामान्य कार्यकर्ता अजून जिवंत आहे. माझा पक्ष, माझा स्वाभिमान", असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपाला इशारा दिला आहे.
दोन महापालिकांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीत
विदर्भातील चार महापालिकांची निवडणूक होत आहे. यात नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे. यातील अकोला आणि चंद्रपूर महापालिकेत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत लढणार आहे. पण, जागावाटपाचा पेच फसलेला आहे.
अकोल्यात याच मुद्द्यावरून आता नाराजी चव्हाट्यावर आली आहे. अकोल्यामध्ये भाजपा ५५ जागा, शिंदेसेना १५, तर राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढणार, असा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, त्यापूर्वी मिटकरींनी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाने ४८ जागा जिंकल्या होत्या. एकसंध असलेल्या शिवसेनेला ८ जागा जिंकता आल्या होत्या. तर काँग्रेसला १३ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमने १ जागा जिंकली होती, तर अपक्ष आणि इतर पक्षांना ५ जागा मिळाल्या होत्या.
शिंदेसेनेला १८ जागा देण्याची शक्यता; राष्ट्रवादीही सोबत
भाजपच्या ४८ सिटिंग जागा सोडल्यानंतर उर्वरित ३२ जागांपैकी नेमक्या कोणत्या जागा शिंदेसेनेला देणार, हा प्रश्न असून, प्रभाग १७ मध्ये उमेदवारीसाठी भाजपने मागणी केली आहे. या प्रभागात शिंदेसेनेचे ४ नगरसेवक निवडून आले होते; यावर सन्मानजनक तडजोड कशी करता येईल यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करीत आहेत, असे शिंदेसेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी सांगितले.
महायुतीत १८ जागा शिंदेसेनाला देण्यात येत आहेत. परंतु आम्ही २१ जागांवर आग्रही असून, पक्षाचे निरीक्षक शशिकांत खेडकर व श्रीकांत देशपांडे यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेणार आहोत, अशी माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी दिली.
भाजपच्या सिटिंग जागा सोडल्यानंतर उर्वरित ३२ पैकी १८ जागा शिंदेसेनेला हव्या आहेत. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिंदेसेनेचे उपनेते आणि भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजेरिया यांनी दिली.
भाजप-शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चर्चा सकारात्मक सुरू असून, लवकरच जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती भाजपचे निवडणूक प्रभारी व माजी महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. त्यामुळे आता अखेरपर्यंत काय घडणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.