महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:27 IST2025-12-31T10:25:20+5:302025-12-31T10:27:05+5:30
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वेगळेच समीकरण जुळून आले आहे. भाजपाने राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण, आता दोनच पक्षांची युती होऊ शकली आहे.

महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
अकोला महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष शिंदेसेना आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष उद्धवसेना या दोन्ही पक्षांसह वंचित बहुजन आघाडीनेही 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पक्ष-शिंदेसेना आणि काँग्रेस-उद्धवसेनेत जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने, या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देत रिंगणात उडी घेतली आहे.
काँग्रेसने काही प्रभागांत उद्धवसेनेला पाठिंबा देत, उमेदवारी देण्याचे टाळले आहे. वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसमध्ये न जमल्याने 'वंचित'नेही ५३ उमेदवार दिले आहेत.
भाजपा-शिंदेसेनेची युती का होऊ शकली नाही?
महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. परंतु, शिंदेसेनेने २१ जागांच्या मागणीवर ठाम राहत अखेरच्या क्षणापर्यंत मागणी रेटली. त्यामुळे भाजपची शिंदेसेनेसोबत युती होऊ शकली नाही. शेवटी भाजपने ६२ जागी उमेदवार देत १४ जागा राष्ट्रवादी (अजित पवार) आणि ४ जागा इतर घटकपक्षांना सोडल्या आहेत.
जागांचा तिढा न सुटल्याने शिंदेसेनेकडून ७४ जागांवर उमेदवार रिंगणात आणण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी अनुक्रमे ५० व २५ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक नाना गावंडे यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या चर्चेत सहभाग घेतला.
उद्धवसेनेच्या उमेदवारांना काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने दिला पाठिंबा
महाविकास आघाडीतील घटकपक्ष उद्धवसेनेने सुरुवातीपासूनच ५५ जागा लढविण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे आघाडीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. त्यावर अखेरपर्यंत एकमत होऊ शकले नाही.
आघाडीत दोनच पक्ष लढत आहेत. प्रभाग ४, ६, १३ व २० मध्ये उद्धवसेनेच्या उमेदवारांना काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा दिला आहे. काही जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातही मैत्रीपूर्ण लढती होण्याची चिन्हे आहेत.