Lok Sabha Election 2019 : भाजपा हवेत, काँग्रेस ‘गॅस’वर, वंचित आशेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:09 IST2019-04-05T15:08:53+5:302019-04-05T15:09:06+5:30

अकोल्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे. मतदारांचा कानोसा अन् राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर अकोल्यातील भाजपा सध्या ‘हवेत’ असल्याचे स्पष्ट होते.

 Lok Sabha Election 2019: BJP in the air, Congress on gas | Lok Sabha Election 2019 : भाजपा हवेत, काँग्रेस ‘गॅस’वर, वंचित आशेवर!

Lok Sabha Election 2019 : भाजपा हवेत, काँग्रेस ‘गॅस’वर, वंचित आशेवर!

- राजेश शेगोकार
अकोल्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे. मतदारांचा कानोसा अन् राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर अकोल्यातील भाजपा सध्या ‘हवेत’ असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस उमेदवाराच्या घोषणेपासून काँग्रेस पक्षात सुरू झालेली चर्चा अकोल्यात उमेदवार नाही तर प्रत्यक्ष पक्षच गॅसवर असल्याचे प्रत्यंतर देणारी आहे. दुसरीकडे भारिप-बमसंच्या अंगरख्याला वंचित बहुजन आघाडीची झालर लावल्याने मतांची बेगमी वाढेल, अशा आशेवर हा पक्ष असल्याचे दिसत आहे. मतदारांची चर्चासुद्धा याच अंगाने फिरत असल्याने मतदार कुणाला कौल देणार व कुणाचा ‘निकाल’ लावणार, याचे अंदाज आता रंगत आहेत.
१९९८, १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर गेल्या तीन दशकांपासून अकोल्यात भाजपाचे ‘एक’हाती साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून संजय धोत्रे यांनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत करून पक्ष संघटनेवरही वर्चस्व प्रस्थापित केले आहे. २००४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे यांना १ लाख ६ हजार ३७१ मतांनी पराभूत केले. त्यावेळी काँग्रेस व अ‍ॅड. आंबेडकर यांना अनुक्रमे २८ व २५ टक्के मते मिळाली. मतांचे झालेले विभाजन तसेच मराठा समाजाची एकजूट यामुळे धोत्रेंचा विजय झाला अन् विजयाची शृंखला सुरू झाली. २००९ मध्ये मराठा समाजातच मतांचे विभाजन झाले; मात्र विजय भाजपाचाच झाला. २०१४ मध्ये मोदी लाट हा सर्वात मोठा फॅक्टर असल्याने धोत्रेंचे मताधिक्य हे दुपटीने वाढले. भाजपाला सातत्याने मिळालेल्या विजयामुळे भाजपामध्ये वाढलेल्या आत्मविश्वासासोबतच काही पदाधिकाऱ्यांमध्ये बेफिकिरीही आली आहे. त्यामुळेच २०१९ ची निवडणूक ही सहज सोपी असल्याचा दावा करीत हे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या ‘हवेत’ आहेत. शिवसेनेसारख्या मित्रपक्षालाही ‘कामापुरते’ अशा स्वरूपाची मिळणारी वागणूक ही त्यांचा ‘हवे’चा परिणाम आहे. विशेष म्हणजे, पक्षातील अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही गृहीत धरण्याचे बेफिकिरीचे प्रमाण वाढले असल्याची प्रांजळ कबुली अनेक जण खासगीत देतात. त्यामुळे सध्या तरी हवेतच गणिते मांडली जात आहेत; मात्र हे राजकारण आहे, त्याची हवा कधीही बदलते, याची जाणीवही असणे तेवढेच गरजेचे असल्याची अनेक मतदारांची भावना खूपच बोलकी आहे.

काँग्रेसने शेवटपर्यंत उमेदवार ठरविण्याचा घोळ घातला अन् २०१४ ची निवडणूक लढविलेल्या जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्याच गळ्यात उमेदवारीचा हार टाकला. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील वातावरण हे चैतन्याऐवजी चिंतेचेच होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचे चार दिवस त्यांना पदाधिकाºयांसोबत संवाद साधण्यातच गमवावे लागले. आता कुठे पदाधिकारी जमू लागले असतानाच मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीतच झालेल्या तीन-तीन स्वतंत्र बैठका पाहता या पक्षातील गटबाजीला बाजूला ठेवत त्यांना सोबत घेण्याचे आव्हान हिदायत पटेल यांच्यासमोर आजही कायमच आहे. पटेल यांच्याविरोधात पक्ष व विरोधकांमधून त्यांची उमेदवारी ‘डॅमेज’ करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे काँग्रेसमध्ये आत्मविश्वास वाढण्याऐवजी काँग्रेस ‘बॅकफुट’ गेली आहे.
सध्या काँग्रेसचा प्रचारही जशी दिशा मिळेल, तसा सुरू आहे. प्रचारासाठी ना नियोजन आहे ना समन्वय, स्थानिक नेत्यांचाच आधार घेत त्या-त्या तालुक्यात होणाºया बैठका अन् सभा यावरच काँग्रेसचा भर असून, एकसंधपणे कुठेही प्रभाव जाणवेल, अशा प्रचाराचा सध्या तरी अभावच दिसून येतो. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेससोबत सर्व पदाधिकाºयांची एकही समन्वय बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अजूनही चैतन्य दिसत नाही. २०१४ च्या मोदी लाटेत काँगे्रसच्या याच उमेदवाराने दिलेली लढत ही वाखाणण्याजोगी होती. आता तशी तरी लढत होईल का, अशी चिंता खुद्द काँग्रेसच्या गोटात व्यक्त केली जात असल्याने पक्षाचे अस्तित्वच ‘गॅस’वर आहे. येणाºया काही दिवसांत ही परिस्थती सुधारेल, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांना आहे.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सलग तीन निवडणुकांमध्ये विजयाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी पूर्ण ताकदीने रिंगणात उतरण्याची तयारी गतवर्षासूनच जोमात केली आहे. काँग्रेसची साथ मिळणार नाही, हे गृहीत धरूनच त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने भारिप-बमसंचा विस्तार केला. त्यामुळे परंपरागत मतांचाही विस्तार होईल, असा त्यांचा अंदाज आहे. तीन निवडणुकांचा आढावा घेतला तर अ‍ॅड. आंबेडकरांना मिळालेली मते ही चढत्या क्रमाने आहेत. या मतांची सरासरी ही २ लाख २० हजारांच्या जवळपास येते. त्यामुळे ‘वंचित’च्या विस्तारामुळे या मतांमध्ये किती भर पडेल, यावरच त्यांच्या लढतीची तीव्रता अवलंबून आहे. गत वर्षभरात त्यांनी परंपरागत दलित मतांसोबतच ओबीसी व मुस्लीम मतांचा जागर करणाºया परिषदांमधून केलेली मोर्चेबांधणी फलद्रूप होण्यासाठी त्यांना ‘एमआयएम’ या त्यांच्या मित्राचा मोठा आधार मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. त्यासाठी काँगे्रसचीच मतपेढी आपल्याकडे वळवावी लागणार आहे. सध्या वंचितसमोर आव्हानांची मालिकाच आहे. एकतर अ‍ॅड. आंबेडकर हे सोलापूरमुळे पूर्णवेळ अकोल्यात प्रचारात थांबू शकणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल कायम ठेवणे, एमआयएमच्या कट्टर चेहºयामुळे ओबीसीतील घटक दुरावणार नाही, याची काळजी घेणे अन् प्रत्येक वेळी अ‍ॅड. आंबेडकर रिंगणात असतानाही काँग्रेसने कायम ठेवलेली स्वत:ची मतपेढी आपल्याकडे वळविणे, या आव्हानांवर ते मात करू शकले तरच ‘वंचित’आघाडी मतांची लांब उडी मारेल. नेमकी हीच आशा कार्यकर्त्यांना असल्याने ती कितपत फलद्रूप होईल, हे पाहणे रंजक ठरेल.

 

Web Title:  Lok Sabha Election 2019: BJP in the air, Congress on gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.