Lok Sabha Election 2019 : तिरंगी लढतीत मतांच्या विभाजनाकडे लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:37 IST2019-04-09T12:37:46+5:302019-04-09T12:37:53+5:30
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असून, त्यामध्ये गठ्ठा मतांच्या विभाजनात सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

Lok Sabha Election 2019 : तिरंगी लढतीत मतांच्या विभाजनाकडे लक्ष!
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असून, त्यामध्ये गठ्ठा मतांच्या विभाजनात सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत मतांचे विभाजन कसे होते आणि त्याचा कोणाला फायदा होणार, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना मिळलेली मते लक्षात घेता, मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची संख्या असलेल्या मराठा व कुणबी समाजाच्या गठ्ठा मतांच्या आधारे यापूर्वीच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये लागोपाठ भाजपा उमेदवाराचा विजय झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मताधिक्य कायम ठेवत भाजप उमेदवाराचा विजय होणार असल्याचे बोलले जात असले; तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारास बहुसंख्य मुस्लीम समाजाच्या मतांसह भाजपाला मिळणाऱ्या मतांपैकी १ लाखावर मते काँग्रेस उमेदवाराकडे वळविण्याची व्यूहरचना महाआघाडीने आखली आहे. तर दुसरीकडे मागासवर्गीयांच्या गठ्ठा मतांसह बहुजनांमधील वंचित घटक आणि काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम समाजाची मते मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. तिरंगी लढतीत मतांच्या विभाजनात गठ्ठा मतांचा कल कोणाकडे जातो आणि त्याचा फायदा कोणाला मिळतो, याकडे आता मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
मुस्लीम समाजाचा कल कोणाकडे?
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील तिरंगी लढतीमध्ये मुस्लीम समाजाची सर्वाधित मते मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत; परंतु यापैकी कोणाला जवळ करायचे, यासंदर्भात मुस्लीम समाजाचा अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे मुस्लीम समाज मतदारांचा कल कोणाकडे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. तथापि, यासंदर्भात येत्या १० एप्रिलनंतर मुस्लीम समाजाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.