कागदावर आघाडी, मैदानात सघर्ष! मविआत काही जागांवर समन्वय, कुठे थेट लढती; मित्रपक्षाच्या लढतीत लाभ कुणाचा?
By नितिन गव्हाळे | Updated: January 1, 2026 17:35 IST2026-01-01T17:33:56+5:302026-01-01T17:35:41+5:30
काही ठिकाणी तीनही पक्षांमध्ये समन्वय पाहायला मिळतो तर काही ठिकाणी थेट लढती होणार असेच चित्र अकोला महापालिकेमध्ये आहे.

कागदावर आघाडी, मैदानात सघर्ष! मविआत काही जागांवर समन्वय, कुठे थेट लढती; मित्रपक्षाच्या लढतीत लाभ कुणाचा?
- नितीन गव्हाळे, अकोला
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांकडून प्रभागनिहाय वेगवेगळी रणनीती आखली जात असल्याचे या उमेदवार याद्यांवरुन स्पष्ट होत असून, काही ठिकाणी तीनही पक्षांमध्ये समन्वय पाहायला मिळतो तर काही ठिकाणी थेट लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. मित्रपक्षांमधील या लढतीचा कोणाला फायदा होतो की नुकसान होते, ही बाब महत्वाची आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसने चार उमेदवार दिले असून, उद्धवसेनेने येथे उमेदवार न देता माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्येही अशीच स्थिती असून, काँग्रेसने चार उमेदवार उभे केले आहेत, तर उद्धवसेना निवडणुकीपासून दूर राहिली आहे. यावरून काही प्रभागांत समन्वय दिसत असल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये मात्र तिन्ही पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे उद्धवसेनेने तीन, काँग्रेसने चार तर राष्ट्रवादी (शरद पवार) ने एक उमेदवार दिला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेस व उद्धवसेना प्रत्येकी दोन जागांवर थेट लढतीत आहेत. प्रभाग क्रमांक ६ मध्ये तिन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येथे काँग्रेसने दोन, राष्ट्रवादीने दोन आणि उद्धवसेनेने तीन उमेदवार दिले आहेत.
प्रभाग ८ ते ११ : आघाडीत लढत!
प्रभाग क्रमांक ८, ९, १० आणि ११ मध्ये काँग्रेसने प्रत्येकी चार उमेदवार दिले आहेत. प्रभाग ८ मध्ये उद्धवसेना (४) व राष्ट्रवादी (३), प्रभाग ९ मध्ये उद्धवसेना (३) व राष्ट्रवादी (३), प्रभाग १० मध्ये उद्धवसेना (४) आणि प्रभाग ११ मध्ये उद्धवसेना (१) व राष्ट्रवादी (१) उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रभाग १२ मध्ये काँग्रेसचे तीन तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार आहे. प्रभाग १४ मध्ये काँग्रेसने दोन उमेदवार दिले आहेत.
प्रभाग १७ व १८ मध्ये काँग्रेस, उद्धवसेनेत लढत
प्रभाग १७ आणि १८ मध्ये काँग्रेस (४), उद्धवसेना (३) आणि राष्ट्रवादी (१ ते २) अशी स्थिती आहे. प्रभाग १२ व २० मध्ये काँग्रेसने उमेदवार दिले असून, याठिकाणी उद्धवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आहे.
उमेदवारीवरून शिंदेसेना आणि काँग्रेसमध्ये खदखद वाढली!
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या मुद्द्यावरून शिंदेसेनेसह काँग्रेस पक्षातही अंतर्गत असंतोष उफाळून येत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शिंदेसेनेचे शहरप्रमुख रमेश गायकवाड यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शिंदेसेनेचे पश्चिम शहरप्रमुख रमेश गायकवाड यांनी तिकीट नाकारल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, पक्षात मराठी माणसाला डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असताना ऐनवेळी आपले तिकीट कापून पक्षाबाहेरील उमेदवाराला संधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी पक्षातील काही पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या शहरप्रमुख उषा विरक यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.