भाजपा विरोधकांच्या बैठकांचा रतीब! बहुमताचा आकडा जुळवण्यात कोणाला यश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 17:14 IST2026-01-26T16:55:47+5:302026-01-26T17:14:31+5:30
अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी एक बैठक पार पडली. त्यात बहुमताचा आकडा जुळवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

भाजपा विरोधकांच्या बैठकांचा रतीब! बहुमताचा आकडा जुळवण्यात कोणाला यश?
अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, रविवार २५ जानेवारी रोजी भाजपविरोधी आघाडीच्या बैठकीत नगरसेवकांचे संख्याबळ जुळविण्याची रणनीती ठरविण्यात आली. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे नाही; मात्र सर्वाधिक ३८ जागा जिंकलेल्या भाजपकडून महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या नगरसेवकांचा आकडा भाजपने जुळवला आहे.
यामध्ये 'शहर सुधार आघाडी' या नावाने एकत्र येत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि महानगर विकास समितीने गटाची नोंदणी केली. या गटात भाजपच्या ३८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना व महानगर विकास समितीचा प्रत्येकी एक अशा ४४ नगरसेवकांचा समावेश आहे.
आघाडीचे गटनेते म्हणून पवन महल्ले यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असतानाच, २१ जागा जिंकलेल्या काँग्रेससह समविचारी पक्षांच्या भाजपविरोधी आघाडीकडूनही महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामध्ये रविवार, २५ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे भाजपविरोधी आघाडीच्या स्थानिक नेत्यांसह नगरसेवकांची बंदद्वार बैठक घेण्यात आली.
'मॅजिक फिगर'चा दावा!
महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ४१ नगरसेवकांच्या पाठबळाचा 'मॅजिक फिगर' भाजपविरोधी आघाडी पार करणार असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात आला आहे.
रणनीतीवर चर्चा
बैठकीत रणनीती ठरविण्यात आली. यासोबतच महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारी दाखल करण्यावरही चर्चा झाली. बैठकीला काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण, उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राष्ट्रवादी (शरद पवार) जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, नगरसेवक आशिष पवित्रकार उपस्थित होते.