Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:54 IST2025-12-29T10:52:24+5:302025-12-29T10:54:23+5:30
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुसाठी अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. भाजपत उमेदवारी मिळण्यासाठी एक हजार २२४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
-सचिन राऊत, अकोला
भाजपकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली असून, बंडाळी टाळण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही शेवटच्या क्षणी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस अवधी असताना अद्याप उमेदवारी निश्चित झाली नसल्याने इच्छुकांच्या नजरा एबी फार्म मिळण्याकडे लागलेल्या आहेत.
अकोला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीस प्रारंभ झाला असून, महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, आदी राजकीय पक्षांनी तयारी केली आहे.
केंद्र व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपात उमेदवारी मागण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. कोणा-कोणाला उमेदवारी द्यावी, हा गंभीर प्रश्न नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. अशातच शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांतील महायुतीवर अद्याप एकमत झालेले नाही. एकंदरीत २० प्रभागांसाठी इच्छुक असलेल्या १ हजार २२४ जणांमधून निवडक उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी भाजप नेत्यांची मोठी कसोटी लागत आहे.
युतीत इच्छुकांचा जीव टांगणीला
भाजप नेत्यांनी निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याची रणनीती आखली आहे. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
चिन्हावर लढण्याची तयारी
भाजपत उमेदवारी मिळण्यासाठी एक हजार २२४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात मुस्लीम बहुल भागातूनही 'कमळ'वर निवडणूक लढविण्याची तयारी इच्छुकांनी दर्शविली आहे. सर्वेक्षणानुसार भाजपकडे उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. भाजपचे बेल्ट असलेल्या प्रभागातून 'परिवार' सदस्यांना प्राधान्य दिले जाईल.
यादी की गोपनीय निरोप
भाजपकडे इच्छुकांची गर्दी बघता उमेदवारी यादी जाहीर होईल की केवळ ही यादी तयार करून प्रत्येकाला बोलावून गोपनीयरीत्या एबी फार्म दिला जाईल याकडे लक्ष लागले आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत गोपनीयता बाळगली असल्याने इच्छुकांचा जीवही टांगणीला लागला आहे.