‘वंचित’च्या उमेदवाराने लावले फ्लेक्स; महापालिकेने दाखल केला गुन्हा 

By अरुण वाघमोडे | Published: April 29, 2024 05:57 PM2024-04-29T17:57:29+5:302024-04-29T17:58:38+5:30

होर्डिग्जवर ‘ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावे’ असा मजकूर होता.

VBA candidate planted flakes A case has been filed by the Municipal Corporation | ‘वंचित’च्या उमेदवाराने लावले फ्लेक्स; महापालिकेने दाखल केला गुन्हा 

‘वंचित’च्या उमेदवाराने लावले फ्लेक्स; महापालिकेने दाखल केला गुन्हा 

अहमदनगर: महापालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन नगर शहरात आम्ही होर्डिंग्ज लावले होते, याबाबत मात्र पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेने आक्षेप नोंदवत आमच्यावर गुन्हा दाखल केला. प्रस्थापितांच्या दबावाला बळी पडूनच मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केले असून, आमच्याबाबत ही दडपशाही आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी केला.
खेडकर यांच्या प्रचारार्थ राजेेंद्र काशिनाथ पडोळे यांनी २४ एप्रिल रोजी महापालिकेकडे परवानगी घेऊन शहरात काही ठिकाणी होर्डिंग्ज लावले होते.

या होर्डिग्जवर ‘ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावे’ असा मजकूर होता. तसेच यावर प्रकाशक म्हणून रियाज अब्दुल अजीज सय्यद यांचे नाव होते. या होर्डिंग्जबाबत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर मनपाचे नगररचनाकार सर्वेश चाफळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पडोळे व सय्यद यांच्याविरोधात २८ एप्रिल रोजी भादंवि कलम १८८, १७१ (ग) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. या विषयाच्या अनुषंगाने पडोळे व खेडकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

खेडकर म्हणाले ‘ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावे’ असे आवाहन करणे चुकीचे नाही. आमच्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी परवानगी दिली, तेच गुन्हा दाखल करत आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे. ओबीसी ही जात नाही तर तो मोठा संवर्ग आहे. एकत्र या, सहकार्य करा, भांडण करू नका, अशा आशयाचा हा सकारात्मक संदेश होता. मात्र, आमच्या या संदेशाचा चुकीचा अर्थ काढून केलेली कारवाई निषेधार्थ आहे. अशा पद्धतीने राज्यात ओबीसी नेत्यांना विनाकारण लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. मी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणूनच अशा पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मी मात्र ओबीसींसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: VBA candidate planted flakes A case has been filed by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.