Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:47 IST2019-10-09T14:30:08+5:302019-10-09T15:47:20+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघामधून शिवसेनेने साहेबराव नवले यांना मैदानात उतरवले आहे.

Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीसंगमनेर येथील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी भाजपा-शिवसेना हा वाद करत बसू नका. आपल्याला महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार आणायचंय. कमळ-बाण हे एकच आहेत. काही शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्या शिवसैनिकांची मी माफी मागतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. तसेच, सुजय विखेंनाही एक सल्ला दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार मैदानात आहे. दरम्यान, त्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज संगमनेर येथे झाली. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना, मी आता येतानाच गाडीत सुजयला बोललो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सुजय विखेंना उद्धव ठाकरेंनी सल्ला दिलाय. 'सुजयशी बोलताना मी म्हटलं. सुजय तू न्युरोसर्जन आहे, आपल्याकडे तर न्युरोसर्जन पाहिजेच. राजकारण म्हटलं की म्हणतात मेंदूची गरज नसते. पण, आपल्याकडेसुद्धा बुद्धीवान माणसं पाहिजेच. न्युरोसर्जन तर पाहिजेच. कारण, ज्यांची बुद्धी बिघडते त्यांचं थोडं ऑपरेशन करावच लागतं. म्हणून, तू प्रॅक्टीस सोडू नकोस, अभ्यास सोडू नकोस, असा सल्ला मी सुजयला दिल्याचे उद्धव ठाकरेंनी संगमनेर येथील सभेत सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हेही सभेवेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर तेजस ठाकरे हे सुद्धा सक्रिय राजकारणात उतरणार का, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. मात्र, स्वत: उद्धव ठाकरेंनीच तेजस ठाकरे हे केवळ सभा पाहण्यासाठी आले असून, ते जंगलात रमतात, असेही स्पष्ट केले.