BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:17 PM2024-04-11T12:17:28+5:302024-04-11T12:18:43+5:30

शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना फायदा होणार आहे.

BRS leader ghanshyam shelar joins congress in the presence of Balasaheb Thorat Nilesh Lanka will get strength in the lok sabha | BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

BRSचा बडा नेता बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये; नगरमध्ये निलेश लंकेंना मिळणार बळ

Amhednagar Lok Sabha ( Marathi News ) : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसच्या राज्य सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना फायदा होणार आहे.

तेलंगणात सत्ता असताना के. चंद्रशेखर राव यांनी शेजारचं राज्य असणाऱ्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं होतं. राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये डावललं गेल्याची भावना तयार झालेल्या अनेक नेत्यांनी राव यांच्या बीआरएस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने नगर, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यातील नेत्यांचा समावेश होता. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बीआरएसला अस्मान दाखवत दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर बीआरएसला महाराष्ट्रात मोठी गळती लागली असून त्या पक्षात गेलेले महाराष्ट्रातील नेते पुन्हा राज्यातील जुन्या पक्षांकडे धाव घेऊ लागले आहेत. राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये गेलेल्या घनश्याम शेलार यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

घनश्याम शेलार यांची राजकीय कारकीर्द

घनश्याम शेलार हे अनेकदा केलेल्या पक्षांतरामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत शेलार यांनी बीआरएसची वाट धरली होती. घनश्याम शेलार यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. केवळ ७५० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे  माजी आमदार राहुल जगताप हे पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने शेलार यांच्या मनात अस्वस्थता होती. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी बीआरएसमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यासह आसपासच्या परिसरात चांगला जनसंपर्क असणारे घनश्याम शेलार महाविकास आघाडीत आल्याने निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत मदत होणार आहे.
 

Web Title: BRS leader ghanshyam shelar joins congress in the presence of Balasaheb Thorat Nilesh Lanka will get strength in the lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.