महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:35 IST2025-12-26T10:34:25+5:302025-12-26T10:35:30+5:30
जागावाटपाचा तिढा कायम! उमेदवारी करण्यावर ठाम, खासदारांचे संपर्क अभियान सुरू

महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
अहिल्यानगर - महायुतीत चार ते पाच प्रभागांत एकमत झाले आहे. उर्वरित प्रभागांत तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या वाटाघाटातील काहींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. काठावर असलेल्यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था केली असून, भाजपामधील काहीजण महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीत ऐनवेळी मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत परंतु, अद्याप जागा वाटप झालेल्या नाहीत. वरिष्ठांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. एकूण १७ प्रभागांतून ६८ नगरसेवक महापालिकेत पाठवायचे आहेत परंतु, एकाच पक्षाचे प्राबल्य आहे असे काही प्रभाग आहेत. अशा प्रभागांतील जागावाटपावर महायुतीत जवळपास एकमत झाले आहे. इतर प्रभागांची बोलणी सुरू आहेत. शिंदेसेना २४ जागांवर ठाम आहे. कोतकर समर्थकांनी भाजपाकडे मुलाखती दिल्या आहेत परंतु, त्यांनी प्रचार सुरू केल्याने ते नेमके कुणाकडून उमेदवारी करणार आहेत, ते अजून गुलदस्त्यात आहे.
भाजपामधील काही निष्ठावंतांचाही पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. काही असे प्रभाग आहेत की, तिथे महायुतीचे गणित जुळत नाही. महायुतीतील अशा नाराजांचा महाविकास आघाडीकडून शोध घेतला जात आहे. खासदार नीलेश लंके महाविकास आघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी शहरात संपर्क वाढविला आहे. महायुतीतील काही ज्येष्ठ व निष्ठावंत खासदार लंके यांच्या संपर्कात आहेत. महायुतीतील नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यातील नाराज गळाला लावण्याची रणनीती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे.
महायुतीतच फोडाफोडी
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना आणि भाजपाकडे सर्वच प्रभागांत उमेदवार नाहीत. त्यात महायुतीच्या जागावाटपाची चर्चा पुढे सरकलेली नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे. विरोधी पक्षापेक्षा महायुतीतीलच उमेदवार फोडून त्यांना रिंगणात उतरविण्याच्या पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. आमच्या चिन्हावर लढण्याची गळ घातली जात असून महायुतीतच फोडफोडीचे राजकारण रंगले आहे.