रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:38 IST2025-04-22T09:38:04+5:302025-04-22T09:38:31+5:30

लोकप्रतिनिधी, नगर पंचायतीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांत समन्वय न राहिल्याने नगरसेवकांमध्ये असंतोष उफाळून आला.

Another setback for ncp Rohit Pawar Despite an undisputed majority they lost power over Karjat Municipality Who is the new mayor | रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

NCP Rohit Pawar : अविश्वास ठरावापूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी सोमवारी सकाळी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला. त्यामुळे अविश्वास ठरावावर मतदान झालेच नाही. राजीनाम्यामुळे येथील नगराध्यक्ष बदलाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता नगराध्यक्ष पदाची संधी नेमकी कोणाला मिळणार, राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाला की भाजपला? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नगर पंचायतीमध्ये १७ पैकी १५ जागांवर  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या विचाराचे नगरसेवक विजयी करत भाजपच्या ताब्यातून एकहाती सत्ता घेतली. भाजपने अवघ्या दोनच जागांवर विजय मिळाला होता. मात्र, लोकप्रतिनिधी, नगर पंचायतीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांत समन्वय न राहिल्याने नगरसेवकांमध्ये असंतोष उफाळून आला. त्यामुळे त्यांनी नगराध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आणला होता.

कर्जतच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभा बोलावली होती. या बैठकीसाठी सहलीवर गेलेले १३ नगरसेवक कर्जतमध्ये एका खासगी बसमधून दाखल झाले होते. मात्र, त्यापूर्वीच सकाळी साडेदहा वाजता नगराध्यक्षा उषा राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आपल्या वैयक्तिक आणि घरगुती अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा राजीनामा मंजूरही झाला. त्यामुळे अविश्वास ठराव दाखल केलेल्या नगरसेवकांना मतदान करण्याची वेळच आली नाही.
राजीनाम्यामुळे विशेष सभेचा इतिवृत्तांत घेत नगरसेवक सभागृहातून निघून गेले. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी बाकी असल्याने पुन्हा एकदा सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले.

पुढील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाबाबत भाष्य नाही...
"नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा काळ लोटूनही उषा राऊत यांनी राजीनामा न दिल्याने नाईलाजास्तव आम्हाला त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा लागला. आज अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. लवकरच जिल्हाधिकारी पुढील पदाधिकारी निवडीबाबत कार्यक्रम जाहीर करतील. त्यानुसार सर्वानुमते पुन्हा एकत्र येत निवडी होतील," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाचे गटनेते संतोष मेहेत्रे यांनी दिली. मात्र, पुढील नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष कोण? याबाबत त्यांनी भाष्य करणे टाळले.

Web Title: Another setback for ncp Rohit Pawar Despite an undisputed majority they lost power over Karjat Municipality Who is the new mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.