मुंबई : अरबी समुद्रातील उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आजपासून ११ मेपर्यंत कोकणासह राज्याच्या विविध भागात कमाल तापमानाचा पारा चढा राहील.
मुंबईत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता असून, विदर्भासह मराठवाड्यात पारा चाळिशीवर असेल.
दरम्यान, ९ ते ११ मेदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, वाशीम, जालना, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर या भागांत मान्सूनपूर्व पावसासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यात ७ ते ११ मेदरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे.
अरबी समुद्रावरील अॅटिसायक्लोन पुढील आठवड्यात कमी होण्याआधी कोकण किनारपट्टीवरही तापमानवाढ अपेक्षित आहे.
हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्याकडील माहितीनुसार, वाऱ्याची दिशा बदलेल. समुद्रातून जमिनीकडे वाहणारे वारे थोडे विलंबाने म्हणजे दुपारी स्थिर होतील.
तापमान राहणार सामान्य
◼️ मध्य महाराष्ट्रात, पुणे आणि नाशिक येथे शनिवारपर्यंत तापमान ३६ ते ३८ अंश राहील.
◼️ रविवार आणि सोमवारी ३९ ते ४१ अंशांपर्यंत वाढू शकते. येथेही काही ठिकाणी हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे.
वातावरणात आर्द्रता वाढ, पावसाची शक्यता
◼️ वातावरणात आर्द्रता वाढ, पूर्वेकडील वारे आणि घाट भागातील हवामानामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाट परिसरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
◼️ काही ठिकाणी हे ढग पश्चिमेकडे सरकत मुरबाड, लोणावळा आणि महाड भागात हलक्या सरी देऊ शकतात.
विदर्भात पुढच्या काही दिवसांत पुन्हा पारा वाढणार
◼️ मराठवाडा, सोलापूर आणि खानदेशात तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमान ३९ ते ४३ अंश राहील.
◼️ मागील काही दिवसापासून विदर्भात सूर्य आग ओकत होता. त्यानंतर काहीसा दिलासा मिळाला होता.
◼️ मात्र पुढचे काही दिवस पुन्हा तापमानाचा पारा वाढणार आहे.
गोवा, कोकण किनारी सौम्य तपमान
९ ते ११ मेदरम्यान गोवा आणि दक्षिण किनारी कोकण भागात मुंबईसह तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
अधिक वाचा: पावसाचे निसर्ग संकेत; वाचा निसर्गातील कोणकोणते सजीव कसे देतात पाऊस येण्याचे संकेत?
