“भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, जनता ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 03:48 PM2024-04-14T15:48:17+5:302024-04-14T15:48:17+5:30

Congress Nana Patole News: जनता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

congress nana patole criticised bjp over manifesto for lok sabha election 2024 | “भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, जनता ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही”; काँग्रेसची टीका

“भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, जनता ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही”; काँग्रेसची टीका

Congress Nana Patole News: मोदी सरकारने मागील १० वर्ष फक्त अदानीसाठी काम केले, हे सरकारच अदानी सरकार होते पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. २०१४ व २०१९ मध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपाच्या संकल्पपत्रावरून निशाणा साधला.

भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’

सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले. जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: congress nana patole criticised bjp over manifesto for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.