मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:00 PM2024-03-19T14:00:01+5:302024-03-19T14:03:14+5:30

आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Big news Prakash Ambedkars letter to Mallikarjun Kharge a new proposal was given to the Congress | मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

Prakash Ambedkar Letter ( Marathi News ) : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची विरोधकांच्या महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटल्याचं दिसत आहे. कारण आंबेडकर यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असून आम्ही काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचा संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसने आपल्या निवडीच्या कोणत्याही सात जागा सुचवाव्यात, त्या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की, "भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेवेळी तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. या भेटीवेळी आपली सविस्तर चर्चा होऊ न शकल्याने मी आज आपणास हे पत्र लिहीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सतत बैठका होत आहेत. आमच्यासोबत झालेल्या काही बैठकींमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांनी नकार दिला. महाविकास आघाडीत या दोन्ही पक्षांचा वंचित बहुजन आघाडीविषयी असलेल्या चुकीच्या दृष्टीकोनामुळे आमचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे," अशा शब्दांत आंबेडकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसला नवा प्रस्ताव देत आंबेडकर म्हणाले, "हुकूमशाही, विभाजनकारी आणि लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएसचं सरकार घालवण्याचा आमचा मुख्य अजेंडा अजूनही कायम आहे. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रातील सात जागांवर मी वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला मिळालेल्या कोणत्याही सात जागांची आपण मला यादी द्यावी. आमचा पक्ष तुम्ही निवडलेल्या या सात जागांवर काँग्रेसला संपूर्ण पाठिंबा देईल." 

दरम्यान, काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. "वंचित आघाडी आपल्याला देत असलेला हा प्रस्ताव सौजन्यपूर्ण तर आहेच, शिवाय भविष्यातील आपल्या संभाव्य आघाडीच्या दृष्टीकोनातून पुढे केलेला हा मैत्रीचा हातही आहे," असं आंबेडकर यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
 

Web Title: Big news Prakash Ambedkars letter to Mallikarjun Kharge a new proposal was given to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.