केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:42 PM2024-03-04T12:42:55+5:302024-03-04T13:34:29+5:30

पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणलंय, तूच समजावून सांग...राजकारण हा त्यांचा पिंड नाही असा टोला अजित पवारांनी कोल्हेंना लगावला.

Amol Kolhe was resigning in just 2 years; Ajit Pawar's Target Amol Kolhe | केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

मंचर - Ajit Pawar on Amol Kolhe ( Marathi News ) गेल्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करा हे सांगायला मी इथं आलो होतो. दुसऱ्या पक्षातून त्यांना आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. मी आणि दिलीपरावांनी जबाबदारी घेतली. दिलीपरावांनी जुन्नर, खेड आणि आंबेगावची जबाबदारी घेतली. माझ्यावर भोसरी, शिरुर आणि हडपसर ही जबाबदारी होती. त्याप्रकारे ही जागा निवडून आणली. निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे. दिसायला चांगला आहे. पुढे काहीतरी चांगले काम करेल. पण दोन वर्ष झाली आणि त्यांनी मला म्हटलं दादा, मला राजीनामा द्यायचा आहे असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. 

शिरुर येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी म्हटलं की, अमोल कोल्हे माझ्याकडे आले, त्यांनी मला राजीनामा द्यायचा आहे असं म्हटलं. त्यावर मी बोललो, जनतेनं आपल्याला ५ वर्षासाठी निवडून दिले आणि २ वर्षात राजीनामा दिला तर लोक जोड्याने मारतील. असं करू नका. तुमची अडचण काय असं मी विचारले, तेव्हा दादा मी कलावंत आहे. माझी वेगवेगळी नाटके, सिनेमा आहेत त्यावर परिणाम होतोय असं कोल्हेंनी म्हटलं असं सांगत अजितदादांनी पुढे सांगितले, मी खोटं बोलणार नाही. जे काही समोरासमोर करेन. मी कोल्हेंना म्हटलं असं करू नका. दिसायला खराब दिसते त्यावर कोल्हेंनीही उत्तर दिले. "मी सेलिब्रिटी आहे. लोकांना वाटतं मी रोज मतदारसंघात यावे कसं शक्य आहे? मला माझी मालिका असते, त्याठिकाणी काम करावे लागते. मग ते कोण बघणार? माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्यांचे शब्द होते असं अजित पवारांनी जनतेला सांगितले.

तर पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणलंय, तूच समजावून सांग...राजकारण हा त्यांचा पिंड नाही. एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रिटी काढायचे. हेमा मालिनी, सनी देओल, गोविंदा, धर्मेंद्र असे अनेक कलाकार निवडणुकीत उभे राहतात. यांचा राजकारणाची काय संबंध आहे. अमिताभ बच्चन यांनाही एकदा उभे केले होते. शेवटी त्या भागातील विकासकामे करण्याची आवड आहे का हे पाहायला हवे. यात आमचीही चूक आहे. कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही असं सांगत अजित पवारांनी कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केल्याचं कबूल केले. 

दरम्यान, शिवजयंतीला मला भेटले, तेव्हा मी विचारले, मागे तुम्ही राजीनामा देण्याची भाषा केली आणि पुन्हा दंड थोपटले. तेव्हा  मला वाटायला लागलं पुन्हा उभं राहावे. असं कसं चालेल, आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिरुरकरांनो, उद्या लोकसभेसाठी कोल्हे पुन्हा येतील, दादांनी सांगितले ते खरे आहे, पण आता मी काम करायचं ठरवलं आहे बोलतील, पण असं अजिबात नाही. जिथे जागा लढवायची आहे तिथे ३-४ दिवस नाटकांचे प्रयोग चाललेत. त्यातून वातावरण निर्मिती चालली आहे. ते तात्पुरते आहे. देशाची हवा मोदींच्या बाजूची आहे ही वस्तूस्थिती आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश हे भाजपाकडे गेलेले आहे. आम्ही एनडीएमध्ये आहोत. प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला आम्ही मदत करतोय. केंद्रात ज्यांचे सरकार येणार त्यांच्या विचारांचा खासदार हवा. विरोधी पक्षातील खासदार निव्वळ विरोध करायला जातात असं अजित पवारांनी सांगितले. 

Web Title: Amol Kolhe was resigning in just 2 years; Ajit Pawar's Target Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.