भोवळ येऊन गेल्यावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण
By विशाल सोनटक्के | Updated: April 24, 2024 17:16 IST2024-04-24T17:13:40+5:302024-04-24T17:16:31+5:30
Nagpur : प्रकृती ठणठणीत असून वरूडकडे रवाना झाल्याची ट्विटरवरून दिली माहिती

Nitin Gadkari at Pusad
पुसद : महायुतीच्या उमेदवारासाठी आयाेजित प्रचार सभेत बाेलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाेवळ आली. त्यामुळे स्टेजवळ एकच खळबळ उडाली. स्टेजखाली उतरून डाॅक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर पुन्हा ते स्टेजवर आले आणि पुन्हा दहा मिनिटं भाषण केले. उन्हामुळे असह्य वाटले. आता पूर्णपणे प्रकृती ठणठणीत आहे. वरूडकडे रवाना झाल्याची माहिती स्वतः गडकरी यांनी ट्विटरवर दिली आहे.
यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसद येथे केंद्रिय मंत्री गडकरी यांची सभा आयाेजित करण्यात आली हाेती. उपस्थितांना त्यांनी जवळपास १५ मिनिट संबाेधित केले. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या याेजनांची माहिती देत असताना त्यांना अचानक भाेवळ आली. ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांना पकडण्यात आले. स्टेजखाली उपस्थित असलेल्या डाॅक्टरांनी गडकरी यांच्यावर उपचार केले. त्यांची शुगर कमी झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. १५ मिनिट आराम केल्यानंतर गडकरी पुन्हा स्टेजवर आले आणि दहा मिनिटं भाषण केले. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सभा व रॅलीच्या माध्यमातून राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.पुसद येथील सभा आटोपल्यावर गडकरी वरूडकडे रवाना झाले.