Maharashtra Election 2019: Washim: rebels challenge in all three constituencies! |  Maharashtra Election 2019 :  वाशिम : तीनही मतदारसंघात ‘बंडोबा’चे आव्हान!ं
 Maharashtra Election 2019 :  वाशिम : तीनही मतदारसंघात ‘बंडोबा’चे आव्हान!ं

- संतोष वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात स्वपक्षातील दिग्गजांनी बंडाचे निशान फडकावित युती, आघाडीच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. रिसोड मतदारसंघात सेनेचे उमेदवार असतानाही येथे भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव तर काँग्रेसचे उमेदवार असतानाही काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. हीच परिस्थिती वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघातही असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
रिसोड, वाशिम व कारंजा विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ४ आॅक्टोबर रोजी स्वपक्षातील तसेच मित्रपक्षातील दिग्गजांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करून तगडे आव्हान निर्माण केले आहे. महायुतीत वाशिम व कारंजा भाजपाकडे तर रिसोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आघाडीत रिसोड व वाशिम काँग्रेसकडे तर कारंजा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात बंडाळी झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित झनक हे अधिकृत उमेदवार असताना येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उडी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्याने कार्यकर्ते, पदाधिकऱ्यांसमोर ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ हा पेच निर्माण झाला आहे. याच मतदारसंघात शिवसेना, भाजपा महायुतीचे विश्वनाथ सानप उभे असून, येथे भाजपाचे माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या या पावित्र्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. कारंजात ऐनवेळी पक्षबदल झाल्याने आणि पक्षातील निष्ठावंतांना डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीत नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गत दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी चालविली होती. शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्याने ऐनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांनी शिवबंधन काढून हातावर घड्याळ बांधल्याने ठाकरे समर्थकांमधून नाराजीचा सूर उमटला. यासंदर्भात ४ आॅक्टोबर रोजी ठाकरे समर्थकांनी गुप्त बैठक घेऊन पुढील दिशा ठरविल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत ठाकरे यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले नाही तर येथेही बंडखोरी होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीकडून तिकिट न मिळाल्याने तत्कालिन जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी हे बसपाच्या हत्तीवर स्वार होऊन दुसऱ्यांदा नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करीत आहेत.


वाशिममधील लढतीकडे लक्ष लागून
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार लखन मलिक हे महायुतीचे उमेदवार असतानाही येथे शिवसेनेचे गतवेळचे उमेदवार नीलेश पेंढारकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. गतवेळी पेंढारकर यांचा केवळ चार हजार मताने पराभव झाला होता. काँग्रेसने रजनी राठोड यांना ऐनवेळी उमेदवारी जाहिर केल्याने काँग्रेसकडून इच्छूक असलेले डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे बोट धरून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. काँग्रेसमधील बहुतांश नाराज इच्छूकांनी डॉ. देवळे यांची साथ धरल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागून आहे.


भाजपाला सेनेकडून जशास तसे उत्तर
रिसोड विधानसभा मतदारसंघात सेना, भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार असतानाही भाजपाच्या माजी आमदारांकडून उमेदवारी दाखल झाल्याने, चिडून गेलेल्या शिवसैनिकांनी याचा वचपा वाशिम विधानसभा मतदारसंघात काढण्याचा चंग बांधला आहे. वाशिम मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असताना, सेनेच्या गतवेळच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिसोड व वाशिम विधानसभा मतदारसंघातील सेना, भाजपातील कुरघोडी नेमका कुणाचा गेम करणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.


राजकीय उलथापालथ
एकंदरीत स्वपक्षातील तसेच मित्र पक्षातील दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरल्याने मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी नाराजांची मनधरणी वरिष्ठांकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाºया दिग्गजांचे नाराजीनाट्य दूर झाले नाही तर तिनही विधानसभा मतदारसंघातील चित्र विचित्र होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Washim: rebels challenge in all three constituencies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.