Maharashtra Election 2019 : कारंजा मतदारसंघात बंडाचे वादळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:44 PM2019-10-04T14:44:11+5:302019-10-04T14:44:18+5:30

मतदारसंघातील राजकीय समिकरणांना धोका निर्माण झाल्याचे दिसत असून कारंजात रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Maharashtra Election 2019: Rebel storm in Karanja constituency! | Maharashtra Election 2019 : कारंजा मतदारसंघात बंडाचे वादळ !

Maharashtra Election 2019 : कारंजा मतदारसंघात बंडाचे वादळ !

Next

- दादाराव गायकवाड 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस उरला असताना वाशिम जिल्हह्यात बंडाचे वादळ आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कारंजा मतदारसंघात शिवसेना नेते व माजी आमदार प्रकाश डहाके यांना, तर भारीप बमसंमधून बाहेर पडलेले मो. युसूफ पुंजानी यांना बहुजन समाज पार्टीने उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांची ऐनवेळी घोषणा झाल्याने मतदारसंघातील राजकीय समिकरणांना धोका निर्माण झाल्याचे दिसत असून कारंजात रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात विविध पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवसेनेकडून रिसोड, भाजपाकडून वाशिम, कारंजा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीनेही रिसोडसाठी उमेदवार जाहीर केला. तथापि, कारंजा आणि वाशिम मतदारसंघात वंचितच्या उमेदवार घोषणेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कारंजा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेची प्रतिक्षा सर्वांना लागली होती. त्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कारंजा मतदारसंघात प्रकाश डहाके यांना उमेदवारी जाहीर केली, तर बसपाने मो. युसूफ पुंजानी यांना उमेदवारी दिली. प्रत्यक्षात प्रकाश डहाके यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची अपेक्षा असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला होता.मात्र महायुतीच्या चर्चेत हा मतदारसंघ भाजपाला सुटला. त्यामुळे प्रकाश डहाके यांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले.अपक्ष लढण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत उमेदवारी मिळविली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी जि.प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांनी गुरुवारी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला.
दुसरीकडे भारीप बहुजन महासंघाची महत्त्वाची पदे सोडणारे मो. युसूफ पुंजांनी यांना भारीप बमसंच्याच वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तिकिटाची मागणीही केली; परंतु त्यांच्या ऐवजी वंचितने डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे मो. युसूफ पुंजांनीही अडचणीत सापडले होते. त्यांचीही अपक्ष लढण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बसपाकडे उमेदवारी मागितली आणि त्यांनाही बसपाने उमेदवारी जाहीर केली. दरम्यान वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिध्दार्थ देवळे यांची उमेदवारी निश्चित झाली असून उद्या ४ आॅक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होत आहे.


राष्ट्रवादीतही नाराजी
वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकमेव कारंजा हा मतदारसंघ सुटलेला आहे. या मतदारसंघात डॉ. श्याम जाधव आणि माजी जि.प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. या दोघांनीही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी अर्जही दाखल केला होता; परंतु या दोघांनाही ऐनवेळी डावलून प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरे यांना उमेदवारी न दिल्याने सामाजिक न्याय विभाग रा.काँ. जिल्हाध्यक्ष विनोद पट्टेबहादूर यांनी रा.काँ. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Rebel storm in Karanja constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.