Lok Sabha Election 2019 : राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बुथ कमिट्यांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:43 IST2019-04-09T12:43:17+5:302019-04-09T12:43:21+5:30
काडीबाज आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह बुथ प्रमुख व बुथ कमिट्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरील यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती आहे.

Lok Sabha Election 2019 : राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बुथ कमिट्यांवर ‘वॉच’
अकोला: पक्ष कोणताही असो, निवडणूक आली की पक्षात नाराज झालेल्या किंवा पदांवर सामावून न घेतलेल्या असंतुष्टांना अंतर्गत कारवाया करण्याची जणू संधीच चालून येते. याला भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसही अपवाद नाही. अशा काडीबाज आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह बुथ प्रमुख व बुथ कमिट्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरील यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती आहे. या सर्वांच्या बारीक सारीक हालचाली टिपून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात भारतीय जनता पार्टी व महायुतीच्यावतीने विद्यमान खासदार अॅड. संजय धोत्रे यांना चौथ्यांदा उतरविण्यात आले आहे. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाकडून हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. यंदासुद्धा अनेकांचे दावे व अंदाज फेटाळून लावत पक्षाने पुन्हा पटेल यांनाच उमेदवारी बहाल करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. अॅड. प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकूणच चित्र लक्षात घेता २०१४ मधीलच तीनही उमेदवार पुन्हा एकदा एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. यामुळे पुढील चित्र बरेचसे स्पष्ट होत असले तरी राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, असा अनुभव आहे. तीनही उमेदवारांची पक्षावरील पकड ध्यानात घेता आता निवडणुकीच्या कालावधीत पक्षांतर्गत विरोधकांना संधी चालून आली आहे. अपेक्षित पदांवर व कार्यकारिणीत स्थान दिले नसल्याची अनेकांच्या मनात खुमखुमी आहे. मागील पाच वर्षांत भाजप तसेच काँग्रेसमध्ये जनाधार नसणाऱ्यांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी जंगजंग पछाडले. तरीही त्यांच्या अपेक्षा-इच्छा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अशा संबंधितांकडून उघड उघड विरोध न करता पडद्याआडून पक्ष विरोधी कारवाया के ल्या जात आहेत. त्यासाठी अनेकांच्या ध्यानीमनी नसताना त्यांच्या खांद्यांचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. या सर्व बाबी गृहीत धरूनच संबंधित आजी-माजी पदाधिकारी, बुथ कमिट्यांच्या हालचाली व कारवायांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी काही राजकीय पक्षांनी वरिष्ठ स्तरावरून यंत्रणा सक्रिय केल्याची माहिती आहे.
मतदान वळती करण्याचा प्रयत्न
आजच्या घडीला भाजपसह काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा भरणा आहे. शिवसेनेतही अंतर्गत धुसफूस सुरूच राहते. एकमेकांचा मित्र तो आपला राजकीय स्पर्धक, अशा भावनेतून पक्षातील नाराज व असंतुष्ट कामाला लागल्याची चर्चा आहे. स्वपक्षाच्या उमेदवारापेक्षा इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान वळती करण्याच्या अनुषंगाने काही जणांकडून हालचाली केल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.
अनेकांच्या मनात आमदारकीची सल
कधीकाळी पक्षाचे निष्ठावंत असा झेंडा मिरवणाऱ्या जिल्ह्यातील काही माजी लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करून इतर राजकीय पक्षांचा ‘हात’ धरला. तिकीट मिळणार नसल्याची जाणीव होताच पुन्हा ‘घरवापसी’ केली. जातीपातीच्या समीकरणांचा आधार घेऊन पडद्याआडून स्वपक्षाच्या उमेदवारांना ‘धक्का’ देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जिल्ह्यात खमंग चर्चा आहे.