बँकेच्या लॉकरमधून २६ तोळे सोनं काढलं, चुकून दुसऱ्याच्या डिक्कीत ठेवलं, पुढं असं घडलं की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:08 IST2026-01-05T20:07:27+5:302026-01-05T20:08:03+5:30
Vasai: वसईत एका महिलेने नजरचुकीने दुसऱ्याच दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ३५ लाख रुपये किमतीचे २६ तोळे सोने वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कसे शोधून काढले?

बँकेच्या लॉकरमधून २६ तोळे सोनं काढलं, चुकून दुसऱ्याच्या डिक्कीत ठेवलं, पुढं असं घडलं की...
वसईत राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचे लाखो रुपये किंमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले. वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी त्या दागिन्यांचा शोध लावून महिलेच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनी शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली.
वसईच्या गिरीज गावातील रा.सादोडावाडी येथे राहणाऱ्या लिनेट ऍशली अल्मेडा (४२) २ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होळी शाखा येथील बॅसिन कॅथलिक बँकेत गेल्या होत्या. त्यांनी बँकेच्या लॉकरमधून कंगण, चेन, हार, सोन्याचे बिस्कीटे, कर्णफुले असे २६ तोळे वजनाचे व ३५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढले. त्यांनी ते दागिने आणून दुचाकीच्या डीक्कीमध्ये ठेवले. नंतर बाजारात खरेदी करून त्या घरी पोहचल्यावर दुचाकीची डीक्की तपासल्यावर ते सोन्याचे दागिने मिळून आले नाही. त्यांनी लगेच वसई पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितली. वसईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी गांभीर्य लक्षात घेऊन सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांना आदेश दिले.
पीडित महिलेसोबत गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी, अंमलदार यांनी बॅसिन कॅथलिक बँकेच्या होळी शाखा येथे जावून तेथील तसेच परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आले की, पीडित महिलेकडून नजरचुकीने सदर दागिने हे बँकेसमोर तिच्या दुचाकी शेजारी असलेल्या पार्क असलेल्या सामाईक रंगाच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले गेले आहेत. तरी पीडित महिलेने त्यांचे सोन्याचे दागिणे ठेवलेल्या दुसऱ्या दुचाकीचा शोध आजुबाजुच्या परिसरात घेवुन लोकांकडे विचारपुस केली. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही चेक केल्यावर काहीही माहीती मिळुन आली नाही.
त्या अनुषंगाने वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी, अंमलदार यांच्या दोन वेगवेगळ्या टिम तयार करुन घटनास्थळ तसेच शेजारील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराच्या मदतीने तांत्रिक दृष्ट्या तपास करुन महिलेचे गहाळ झालेले सोन्याचे दागिणे हे त्यांनी ठेवलेल्या दुचाकीची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दुचाकी चालक महिला सुनिता फ्रेडी गोन्साल्वीस यांच्याकडे जावून चौकशी करुन गहाळ झालेले सर्व सोन्याचे दागिने पीडित महिलेस परत मिळवून दिले आहे. पीडित महिलेने वसई पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करुन पोलिसांचे आभार मानले आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, वसईचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृण घाडीगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मासाळ, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि महेंद्र भामरे, पोहवा प्रशांत पाटील, सूर्यकांत मुंडे, दिनेश पाटील, प्रशांत आहेर, सौरभ दराडे, अक्षय नांदगावकर, अमोल बरडे यांनी पार पाडली आहे.