फडणवीसांच्या प्रचारसभेदरम्यान फोटोग्राफरला कार्यकर्त्यांच्या गर्दीने पायदळी तुडवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 00:03 IST2024-05-14T23:54:55+5:302024-05-15T00:03:31+5:30
Lok Sabha Election 2024 : फडणवीस व्यासपीठाकडे गेल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे मोर्चा वळवला.

फडणवीसांच्या प्रचारसभेदरम्यान फोटोग्राफरला कार्यकर्त्यांच्या गर्दीने पायदळी तुडवले!
- अनिरुद्ध पाटील
पालघर लोकसभेसाठी महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १४ मे रोजी पावणेपाचच्या सुमारास डहाणूत पोहचले. मात्र त्यांच्या भेटीसाठी आतुर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. फडणवीस व्यासपीठाकडे गेल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे मोर्चा वळवला.
छोट्या मार्गाने फडणवीस आत आले, त्यांच्यासह पदाधिकारी आणि घटकपक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. त्याचा फटका सुरक्षारक्षक आणि उपमुख्यमंत्र्याच्या फोटोग्राफर टीमच्या सदस्याला बसला. गर्दीत अडकलेला फोटोग्राफर जमिनीवर पडला. यानंतर त्याच्या अंगावरून काहीजण गेल्याने त्याला मुकामार बसल्याने तो ओरडला. त्यावेळी त्याला पोलीस आणि काही पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाच्या पूर्वेकडील पायऱ्यांवर बसवले.
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो फोटोग्राफर पुन्हा आपली कामगिरी बजावताना दिसून आला. तर सुरक्षारक्षकाने स्वतःला सावरत आपले कर्तव्य बजावण्यात धन्यता मानली. दरम्यान या सभेत पालकांसह आलेला लहान मुलगा हरवला होता, काही अवधीनंतर तो सापडला असल्याचे डहाणू पोलिसांनी सांगितले.