‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ठरवले दहशतवादी, प्रवाशाचे ट्वीट; जयपूर एक्स्प्रेसमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 08:59 AM2023-10-29T08:59:26+5:302023-10-29T08:59:45+5:30

पोलिसांकडून चारही साधूंची चौकशी

Terrorist decided for not saying 'Jai Shri Ram', passenger's tweets; Type in Jaipur Express | ‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ठरवले दहशतवादी, प्रवाशाचे ट्वीट; जयपूर एक्स्प्रेसमधील प्रकार

‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ठरवले दहशतवादी, प्रवाशाचे ट्वीट; जयपूर एक्स्प्रेसमधील प्रकार

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : ‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या चार साधूंना एका प्रवाशाने दहशतवादी ठरवत पश्चिम रेल्वेच्या हेल्पलाइनवर ट्वीट केले. या ट्वीटनंतर एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी जयपूर- बांद्रा ही ट्रेन पालघर स्थानकात आल्यावर त्या ट्रेनमधून चार साधूंना आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले.  या चारही साधूंचे जबाब लिहून घेत नंतर त्यांना सोडून दिले. परंतु ट्वीट करणारी व्यक्ती वापी स्थानकात उतरल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

दरम्यान, आरपीएफ पोलिसांनी त्या साधूंची अधिक चौकशी केली असता हे साधू पालघर तालुक्यातील वडराई येथील अडगडानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी राजस्थान येथून आल्याचे सांगितले. यावेळी ट्रेन स्थानकात २० मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी या चारही साधूंचे जबाब लिहून घेत नंतर त्यांना सोडून दिले.

तो प्रवासी वापी स्थानकादरम्यान उतरला

पश्चिम रेल्वेच्या जयपूरवरून बांद्राकडे जाणाऱ्या जयपूर-बांद्रा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात ‘चार आतंकवादी दिखाई दे रहे है’ अशा आशयाचे ट्वीट आणि फोटो रेल्वे हेल्पलाइनवर ट्रेनमधील एका प्रवाशाने पाठविला होता.

या ट्वीटमुळे रेल्वे प्रशासनाने याची माहिती पालघर आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना दिली. त्यानुसार पालघर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येणार असल्याने पोलिसांनी तत्काळ ट्रेनच्या तपासणीसाठी सर्वत्र मोठा बंदोबस्त लावला.

ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर एक्स्प्रेसमधून साधूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी डब्यातील इतर प्रवाशांकडे अधिक चौकशी केल्यानंतर ट्वीट करणारा इसम वापी स्थानकादरम्यान उतरल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशाने उलटसुलट प्रश्न विचारले

  • ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने आपल्याशी संवाद साधून अनेक उलटसुलट प्रश्न विचारले. 
  • त्यामुळे आम्ही त्याच्याशी संवाद साधणे बंद केले; परंतु तो आमच्यावर जबरदस्ती करीत ‘जय श्रीराम’ बोलण्याचा आग्रह करू लागला. 
  • आम्ही त्याला कुठलाही प्रतिसाद न दिल्याने त्या प्रवाशाने रेल्वेच्या हेल्पलाइनवर ट्वीट करीत आम्हाला दहशतवादी ठरविले असे एका साधूने ‘लोकमत’ला सांगितले.


राजस्थानचे रहिवासी

  • पोलिसांनी डब्यात बसलेल्या अलखा नंद महाराज (वय ७५), राजाराम बाबा (७८), योगानंद (३४) सह अन्य ४५ वर्षीय साधूंना आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले. 
  • हे चारही साधू राजस्थानमधील रहिवासी असून पॅसेंजर पकडून सवाई माधोपूर स्थानकातून बांद्रा (मुंबई) येथे जाणारी जयपूर बांद्रा एक्स्प्रेस ट्रेन पकडली.

Web Title: Terrorist decided for not saying 'Jai Shri Ram', passenger's tweets; Type in Jaipur Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jaipur-pcजयपूर