पालघरमधील ५ विधानसभा मतदारसंघांत डाॅ. हेमंत सावरा सरस, विरोधी पक्षांना महायुतीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:44 AM2024-06-09T08:44:37+5:302024-06-09T08:45:39+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result:

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: Dr. in 5 assembly constituencies in Palghar. Hemant Savara Saras, Grand Alliance warning to opposition parties | पालघरमधील ५ विधानसभा मतदारसंघांत डाॅ. हेमंत सावरा सरस, विरोधी पक्षांना महायुतीचा इशारा

पालघरमधील ५ विधानसभा मतदारसंघांत डाॅ. हेमंत सावरा सरस, विरोधी पक्षांना महायुतीचा इशारा

- हितेन नाईक
पालघर - पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य पाच विधानसभा क्षेत्रांत डॉ. हेमंत 
सवरा यांनी दोन्ही उमेदवारांना डोके वर काढायची संधीच दिली नाही.

‘मविआ’च्या भारती कामडींपेक्षा १ लाख ८४ हजार २६८ मते आणि ‘बविआ’च्या राजेश पाटील यांच्यापेक्षा ३ लाख ४६ हजार १९७ मते जास्त घेत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना महायुतीने इशारा दिला आहे. मागील २०-२५ वर्षांपासून बविआची एकहाती ताकद हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे.

बोईसर विधानसभेवर बविआचे वर्चस्व असून, लोकसभा लढलेले उमेदवार राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी (७८,७०३ मते) शिवसेनेचे उमेदवार विलास तरे (७५,९५१ मते) यांचा पराभव केला होता. सध्या विलास तरे सेनेतून भाजपमध्ये आल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप, बविआ आणि उद्धव सेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता  राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. 

 पालघर  विधानसभा हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी लोकसभेत भारती कामडी (६४,३५२ मते) यांच्यापेक्षा डॉ. सवरांना मिळालेली अधिक २९,२३९ मते (एकूण मते ९३,५९१) पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत मविआच्या उमेदवाराला धोक्याची घंटा ठरू शकते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आ. श्रीनिवास वनगा (६८,०४० मते) यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. 

- नालासोपारा  विधानसभा क्षेत्रात आ. क्षितिज ठाकूर (१,४९,८६८) यांनी शिवसेनेचे प्रदीप शर्मा (१,०६,१३९) यांचा पराभव केला होता. या अभेद्य गडाला सुरुंग लावण्याचे काम डॉ. सवरा यांनी केले आहे. बविआ उमेदवारापेक्षा ५७,३५८ मते खेचून आणण्यात यश मिळाले आहे. 
- वसई विधानसभेत बविआचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर यांनी २०१९ निवडणुकीत (१,०२,९५०) शिवसेनेचे विजय पाटील (७६,९५५) यांचा पराभव केला होता. 
-  या लोकसभेत महायुतीचे डॉ. सवरा यांनी त्यांच्या वर्चस्वाला छेद देत राजेश पाटील यांच्यापेक्षा २५,४३९ अधिक मते मिळवत ठाकूर यांना पुढील निवडणुकीसाठी इशारा दिला आहे. 

 डहाणू  विधानसभा मतदारसंघात भाजपचे पास्कल धनारे हे २०१४ मध्ये आमदार होते. २०१९ च्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले (७२,११४ मते) यांनी भाजपचे पास्कल धनारे (६७,४०७) यांचा पराभव केला होता. 
लोकसभा निवडणुकीत डॉ. सवरा (८३,०००) यांच्यापेक्षा मविआ उमेदवार भारती कामडी (८३,८८२) यांनी केवळ ८८२ मतांची आघाडी घेतली. 
विक्रमगड विधानसभेत शरद पवार गटाचे सुनील भुसारा (८८,४२५) यांनी विद्यमान खासदार डॉ. सवरा (६७,०२६) यांचा पराभव केला होता. आ. भुसारा हे  मविआमध्ये असले, तरी विद्यमान आमदारांच्या कार्यक्षेत्रात भारती कामडी यांना डॉ. सवरांपेक्षा ३३,२०९ मतांचा फटका बसला.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: Dr. in 5 assembly constituencies in Palghar. Hemant Savara Saras, Grand Alliance warning to opposition parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.