स्थानिकांचे स्थलांतर कमी करण्यावर भर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:23 AM2024-06-11T10:23:21+5:302024-06-11T10:26:32+5:30

Lok Sabha Election 2024 Result: पालघर जिल्हा अनेकदा आरोग्याच्या आणि आदिवासींच्या समस्यांमुळे चर्चिला जातो. येथील रुग्णांना उपचारासाठी गुजरात, नाशिक, ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी जावे लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा हे दणदणीत मतांनी निवडून आले.

Lok Sabha Election 2024 Result: Emphasis on reducing migration of locals, Palghar MP Dr. Hemant Sawra's assurance | स्थानिकांचे स्थलांतर कमी करण्यावर भर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे आश्वासन

स्थानिकांचे स्थलांतर कमी करण्यावर भर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे आश्वासन

- जगदीश भोवड
 पालघर - पालघर जिल्हा अनेकदा आरोग्याच्या आणि आदिवासींच्या समस्यांमुळे चर्चिला जातो. येथील रुग्णांना उपचारासाठी गुजरात, नाशिक, ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी जावे लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा हे दणदणीत मतांनी निवडून आले. पालघर जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

पालघर जिल्ह्यासाठी तुमच्या काय योजना आहेत ?
 पालघर जिल्ह्याचे अनेक प्रश्न असून, डोंगरी, नागरी आणि सागरी असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्याच्या डोंगरी भागात कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी हे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे.

प्रश्न : कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी हे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही काय करणार आहात?
 माझ्या वडिलांनी जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली होती. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कुपोषण कमी झाले आहे. आता मी खासदार म्हणून काम करताना योजनेसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, स्थानिकांचे स्थलांतर कमी कसे होईल, स्थानिक बेरोजगार तरुणांना जिल्ह्यातच रोजगार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात उद्योगांना चालना देणे, स्वयंरोजगार निर्माण करण्यावर भर देणार आहे. 

डोंगरी भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय योजना?
  पालघर जिल्ह्यात धरणे आहेत; मात्र तरीही स्थानिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या भेडसावत असते. त्यामुळे जिल्ह्यात छोटी-छोटी धरणे व्हावीत, स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी प्रयत्न करणार आहे; तसेच सिंचनाबाबत धोरण आखणे गरजेचे आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फूलशेती, फळशेती करता येईल आणि त्यांचे दरवर्षी होणारे स्थलांतर रोखले जाईल; तसेच महिला बचत गटांना अनुदान, साहाय्य मिळत असते. त्यामुळे महिला सक्षम होत आहेत. 

आरोग्याच्या समस्यांची सोडवणूक कशी करणार?
 मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी होत आहे. पालघर येथे सिव्हिल हॉस्पिटल उभारले जात असून, पालघरला मेडिकल कॉलेजही होणार आहे; तसेच जव्हारमध्ये २०० बेडच्या हॉस्पिटलला मान्यता मिळालेली आहे. येथे स्पेशालिस्ट डॉक्टर, तज्ज्ञ स्टाफची गरज भासणार आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

रेल्वे समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना आहेत? 
 वसई-विरार तसेच पालघर-डहाणूपर्यंतचे लोक मुंबईसह अन्यत्र रेल्वेने प्रवास करतात. त्यांच्या अनेक वर्षांच्या समस्या आहेत. यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून गाड्या वाढविण्यासह वसई आणि नालासोपारा यांच्यामध्ये एक नवीन रेल्वेस्थानक निर्माण होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 Result: Emphasis on reducing migration of locals, Palghar MP Dr. Hemant Sawra's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.