"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:57 IST2026-01-10T20:43:05+5:302026-01-10T20:57:19+5:30
तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं नितेश राणे यांनी सांगितले.

"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
वसई - राज्यात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यात मुंबईसह ठाणे, वसई विरार या प्रमुख महापालिकांचाही समावेश आहे. या निवडणुकीत मराठी माणसांच्या अस्तित्वाचा मुद्दा घेऊन ठाकरे बंधू पहिल्यांदाच युतीत निवडणूक लढत आहेत. त्यात मराठी आणि अमराठी मुद्दा चांगलाच गाजतोय. यातच भाजपा मंत्री नितेश राणे यांनी मोठं विधान केले आहे. उत्तर भारतीयांना सुरक्षा हवी असेल तर त्यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला मतदान करावे असं आवाहन करत त्यांनी उद्धवसेना-मनसेलाही थेट धमकी दिली आहे.
वसई विरारमध्ये प्रचार करताना नितेश राणे म्हणाले की, महापालिकेचे निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. जर इथं राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांना सुरक्षा हवी असेल तर त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला जागा दाखवण्याचं काम आमच्या खांद्यावर तुम्ही टाका हा विश्वास मी तुम्हाला देतो. इतर जे पक्ष आहेत ते केवळ राजकारण करायला येतील परंतु उद्धवसेना असेल, राज ठाकरेंच्या मनसेचे लोक तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतात तेव्हा तुम्हाला कुणी वाचवायला येत नाही. तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच ही आपल्या महादेवाची भूमी आहे. इथे आपल्या प्रत्येक कणात महादेवाचा वास आहे. ते भगवाधारी आहे. आपल्या हिंदू राष्ट्रात केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसेना यांनाच निवडून द्यायचे आहे. बाकी जे पक्ष आहेत ते जिहादचं समर्थन करणारे आहेत. त्यांना मतदान करणे म्हणजे जिहादला मतदान करणे आहे हे विसरू नका. तुम्हाला जर ताकद हवी असेल, घरावर प्रभू रामाचा झेंडा फडकवायचा असेल तर तुम्हाला कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करा. येणाऱ्या १५ तारखेला हिंदुत्ववादी विचारांची माणसे निवडून द्या. वसई-विरार नालासोपारा महापालिकेवर जय श्री राम म्हणणारा महापौर बसवायचा आहे असं आवाहन नितेश राणे यांनी लोकांना केले.
मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही, भाजपा नेत्याच्या विधानानं वाद
दरम्यान, देशातील एकमेव असं शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५ हजार कोटी आहे ही लहान रक्कम नाही. चेन्नई बजेट ८ हजार कोटी आहे. बंगळुरू १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील असं भाजपा नेते अन्नमलाई यांनी म्हटलं. मात्र मुंबईचा बॉम्बे उल्लेख करत हे महाराष्ट्रातलं शहर नाही असं म्हटल्याने त्यांचे विधान वादात सापडले.