मीरा भाईंदमध्ये पहाटेपर्यंत भाजपा-शिंदेसेनेत धुमशान; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:01 IST2026-01-15T09:59:51+5:302026-01-15T10:01:45+5:30
या गोंधळात नवघर पोलिसांनी येऊन एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले...

मीरा भाईंदमध्ये पहाटेपर्यंत भाजपा-शिंदेसेनेत धुमशान; नेमकं प्रकरण काय?
मीरारोड - निवडणूक प्रचार १३ जानेवारीच्या सायंकाळी संपून देखील मीरा भाईंदर मध्ये मतदाना आधीची रात्र भाजपा - शिंदेसेनेच्या धुमशान मुळे चर्चेत राहिली. ठिकठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले तर एकमेकांवर पैसे वाटल्याचे आरोप झाले. एकमेकांवर पाळत ठेऊन होते.
भाईंदरच्या आझाद नगरमध्ये भाजपाचे कार्यकर्ते रात्री मतदान पावती सह पैसे वाटत असल्याचे तेथील नागरिकांनीच पकडले. शिंदेसेनेचे उमेदवार पवन घरात व कार्यकर्ते तेथे पोहचले. तर भाजपाचे रणवीर वाजपेयी देखील तेथे होते. शिंदेसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले होते व भाजपा पैसे घेऊन असणाऱ्याला पाठीशी घालत असल्याचे आरोप केले. या गोंधळात नवघर पोलिसांनी येऊन एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
पेणकरपाडा येथे शिंदेसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते त्यांच्या जागेत मतदार यादी बाबत काम करत असताना भाजपाच्या श्वेता निलेश पाटील व कार्यकर्ते यांनी पैसे वाटत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी व पथकाने जाऊन तपासणी केली मात्र काही नव्हते. तरी देखील श्वेता व कार्यकर्ते हे आत घुसल्याने परशुराम म्हात्रे, रिया म्हात्रे या उमेदवारांनी निषेध करत भाजपाच्या गुंडगिरी वर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली.
भाईंदर पश्चिमेस मध्यरात्री दरम्यान भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचे चिरंजीव तकशील मेहता हे कार्यकर्त्यांसह फिरत असल्याने त्यास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. मेहता हे पूर्वेला रहात असताना येथे मध्यरात्री त्यांना पोलिसांनी फिरू कसे दिले? असा सवाल करत ते पैसे वाटपाचे काम करायला आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
त्या आधी भाईंदर पूर्वेच्या भाजपा उमेदवार महेश म्हात्रे यांच्या बंगल्याच्या आवारात सभा व पैसे आणि भेटवस्तू वाटपाचा आरोप शिंदेसेनेने केला. आचार संहिता पथक आले मात्र त्यांनी बंगल्यातून पिशव्या घेऊन बाहेर पडणाऱ्यांची देखील तपासणी केली नाही असा आरोप शिंदेसेनेने केला.
भाजपाच्या तक्रारीं वरून शिंदेसेनेच्या अनेक पदाधिकारी, उमेदवारांची वाहने पोलीस व पथकाने अडवून तपासली. तर एकमेकांच्या पैसे वाटत असल्याच्या तक्रारीं वरून अनेकांच्या घरी, कार्यालयात देखील तपासणी केली गेली. पैसे वाटण्याच्या संशय वरून जागता पहारा कार्यकर्ते व उमेदवारांचा होता. पहाटे पर्यंत तक्रारी व आरोप प्रत्यारोपांचे प्रकार सुरु होते.