मिरा-भाईंदरमध्ये भाजपकडून शिंदेसेनेला १३ जागांचा प्रस्ताव, महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मंत्री प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:58 IST2025-12-29T10:57:34+5:302025-12-29T10:58:33+5:30
मिरा-भाईंदरमध्ये महायुती समन्वय समितीची शुक्रवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती.

मिरा-भाईंदरमध्ये भाजपकडून शिंदेसेनेला १३ जागांचा प्रस्ताव, महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मंत्री प्रताप सरनाईक
मिरा रोड : भाजप व शिंदेसेना युतीबाबत शुक्रवारच्या बैठकीत भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी शिंदेसेनेला १३ जागा देऊ केल्या आणि त्यादेखील भाजपच्या बळावर निवडून येऊ शकतात, असे म्हटले होते, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून, त्यांनी प्रदेशाध्यक्ष व स्थानिक पातळीवर बोलतो, असे सांगितल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. मिरा-भाईंदरमध्ये महायुती समन्वय समितीची शुक्रवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती.
२४ तासांत निर्णय घ्या -
भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी फोन करून बैठकीची वेळ विचारली होती. त्यानुसार भाजप कार्यालयात गेल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी आपण कॉल केला होता, असे मेहतांचे म्हणणे खोडून काढले. तर, युतीबाबत २४ तासांत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम दिला.
आमचे कार्यकर्ते परत करावेत
मेहतांची भाजपचे कार्यकर्ते परत करा, अशी अट आपणास मान्य असून त्यांनीही आमचे नगरसेवक-कार्यकर्ते परत करावेत. त्यांनी कालही विद्यार्थी सेनेचे २ पदाधिकारी भाजपत घेतले. त्यामुळे आम्हीही भाजपचे २०० कार्यकर्ते सेनेत घेतल्याचे सरनाईक म्हणाले.
‘तो’ निर्णय, मेहतांनीच घेतला होता
टाऊनपार्कचे आरक्षण रद्दचा निर्णय मेहता यांनीच नगरसेवक असताना घेतला होता. टाऊनपार्कचे आरक्षण ठेकेदारास देण्याचा निर्णय देखील मेहता नगरसेवक असताना महासभेत झाला आहे, असा गौप्यस्फोट सरनाईक यांनी केला.