मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:27 IST2025-12-29T11:25:22+5:302025-12-29T11:27:51+5:30
मीरारोडच्या जे पी इन्फ्रा संकुलमध्ये मीरा भाईंदर शहर जिल्हा प्रभाग १३ च्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते.

मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची आचार संहिता लागू असताना मीरारोड मध्ये भाजपाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर कोंग्रेसने भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उघडपणे हे गैरप्रकार सुरू असताना पोलिस, महापालिका आणि आचार संहिता पथके भाजपचे काम करत असल्याचे आरोप काँग्रेस सह विविध पक्ष व संघटना यांनी केला आहे.
मीरारोडच्या जे पी इन्फ्रा संकुल मध्ये मीरा भाईंदर शहर जिल्हा प्रभाग १३ च्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या व्यासपीठ बॅनरवर भाजपा पक्षाच्या नाव आणि चिन्ह सह राजकारणी यांचा फोटो टाकलेला होता. यावेळी महिलांना हळदी कुंकूसह विविध भेटवस्तू देण्यात आल्या. सदर प्रभागातील भाजपचे माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार संजय थेराडे, भाजपच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रीती जैन सह भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. ह्या सर्व कार्यक्रम आणि भेटवस्तू वाटपाची छायाचित्रे समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाली आहेत.
आचार संहिता काळात सणाच्या नावाखाली कार्यक्रम करतेवेळी निमंत्रण पत्रिका, बॅनर वर पक्ष, निवडणूक चिन्ह, राजकीय फोटो असू नये. कोणत्याही राजकीय नेत्याचा व उमेदवाराचा सत्कार आयोजित करू नये. कोणत्याही राजकीय नेत्याने, उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये असे निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट आहे. इतकेच काय तर अश्या कार्यक्रम साठी सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये असे आयोगाने स्पष्ट केले असताना देखील सर्रास आचार संहिता भंग करण्यात आली व त्याकडे पोलीस, महापालिका आणि आचार संहिता पथके यांनी कानाडोळा चालवला असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे.
मतदारांना भ्रष्ट मार्गाने मतदानासाठी आमिष दाखवले गेल्याने या प्रकरणात आधी तात्काळ भाजपाचे थेराडे, प्रीती जैन आदींवर गुन्हा दाखल करा. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या, पुरावे नष्ट होऊ देऊ नका. उपस्थितांची पोलिसांनी सखोल चौकशी करून वाटप केलेल्या व छायाचित्रातील सर्व भेट वस्तू जप्त कराव्यात. ह्या सर्व साठी खर्च झालेला पैसा हा भ्रष्टाचाराचा वा काळा पैसा असल्याची दाट शक्यता पाहता त्याची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक अधिनियम आणि मनी लॉन्ड्रींग नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रभाग १३ मधील काँग्रेसचे इच्छुक आणि युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र खरात यांनी केली आहे.