लॉजवर १७ दिवस अडकवून ठेवलेल्या १५ वर्षाच्या मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 19:07 IST2022-11-18T19:06:20+5:302022-11-18T19:07:08+5:30
लॉजवर १७ दिवस अडकवून ठेवलेल्या १५ वर्षाच्या मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

लॉजवर १७ दिवस अडकवून ठेवलेल्या १५ वर्षाच्या मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका
(मंगेश कराळे)
नालासोपारा : अर्नाळा येथील एका लॉजवर १७ दिवस अटकाव करून ठेवलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीची वैश्याव्यवसायातून गुरुवारी सुटका केली आहे. पीडित मुलीने पोलीस हवालदार श्याम शिंदे यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यावर पोलिसांनी सदर लॉजवर छापा टाकून नालासोपारा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने कारवाई केली आहे.
पीडित मुलीने गुरुवारी फोनवर संपर्क करून लक्ष्मण नावाची व्यक्ती जबरदस्ती करुन तिच्याकडून वेश्याव्यवसायाचे काम करुन घेतो, अशी माहिती पोलिसांना दिली. तसेच सध्या त्याने व लॉजवरील इतर पुरूषांनी तिला सी-साइट लॉजींग अर्नाळा येथे रुम नं. १०३ मध्ये १ नोव्हेंबरपासुन थांबवून घेतले आहे. तसेच तेथे देखील तिच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहेत. पीडीत मुलीने त्यानंतर तिच्या आईला देखील सदर ठिकाणी बोलावून घेतले होते. त्यांनतर तिला व तिच्या आईला देखील आरोपीने लॉजमधून बाहेर पडण्यास अटकाव केला होता. सदर प्रकारामुळे नमुद पिडीत मुलगी व तिची आई यांना लॉजमधूृन बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्यामुळे माझी सदर ठिकाणाहून सुटका करुन मदत करा अशी विनंती पीडितेने पोलिसांना केली होती.
त्यावरुन पेालीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी तात्काळ रेस्क्यु फांउडेशन कांदिवलीचे सदस्य, पोलीस स्टाफ, महिला पंच यांचेसह सदर लॉजवर छापा कारवाई करुन पीडित मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत आकाशकुमार भिकारी गुप्ता, सुशांत गणेश पुजारी आणि खलील रेहमान बाडा यांना ताब्यात घेवून अटक केलेली आहे.