मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 17:51 IST2022-12-01T17:50:35+5:302022-12-01T17:51:01+5:30
मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक
नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई विरार महानगरपालिकेचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी करून ते स्क्रॅपमध्ये विकणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. तिन्ही आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मनपाचे कचरा संकलित करणारे कचऱ्याचे ट्रक चोरीला जाण्याच्या घटना मागील दोन महिन्यात घडत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदर चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी वेगवेगळी पथके तयार करून ट्रक चोरी झालेल्या गुन्ह्याच्या घटना स्थळांना भेटी देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मिळालेल्या आरोपीच्या फोटो व माहितीनुसार आरोपी वैजनाथ लांडगे (६५), जहीर शेख (४०) आणि मुजीब शेख (४०) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर ट्रक चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही आरोपींकडून वसई २ आणि आचोळे २ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपींनी चोरलेल्या चार डंपर पैकी १ डंपर आणि इतर ३ डंपर तोडून त्याचे पार्ट वेगळे काढून ते स्क्रॅपमध्ये वि६क्री केले. तपास पथकाने तीन डंपरचे इंजिन, क्लचप्लेट, गिअर बॉक्स आणि डिस्कसह टायर असा एकूण ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी वैजनाथ लांडगे याच्या विरोधात नवी मुंबई आणि परभणी येथे चोरीचे चार गुन्हे नोंद आहेत. तिन्ही आरोपी बाबत माहिती मिळाल्यावर परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. चार गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिली.