हम वर्धावाले है, स्वस्त-महागाचा हिशेब ठेवत नाही; दोनशेची 'नीप' तीनशेला घेतो'; Video व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 12:49 IST2022-06-29T16:49:52+5:302022-06-30T12:49:28+5:30
काही भान हरपलेल्या युवकांकडून दारुबंदी जिल्ह्यात चक्क दारूची ‘ब्रँडिंग’ करण्याचा प्रकार थेट सोशल मीडियावर होत असल्याने ऐतिहासिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे.

हम वर्धावाले है, स्वस्त-महागाचा हिशेब ठेवत नाही; दोनशेची 'नीप' तीनशेला घेतो'; Video व्हायरल
वर्धा : हा जिल्हा थोर पुरुषांचा जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे. याच जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी या थोर महात्म्यांचा पावन स्पर्श लाभलेला आहे. मात्र, काही भान हरपलेल्या युवकांकडून दारुबंदी जिल्ह्यात चक्क दारूची ‘ब्रँडिंग’ करण्याचा प्रकार थेट सोशल मीडियावर होत असल्याने ऐतिहासिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. याकडे सायबर सेल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधीजींचा वारसा लाभला असल्याने वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारुबंदी झाली. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत दारुबंदी केवळ कागदावरच आहे. पोलीस विभाग वेळोवेळी दारू विक्रेत्यांवर कारवाई करतात. पण, दारू विक्री बंद करण्यास पोलीसदेखील असमर्थ ठरताना दिसतात. मात्र, सध्या याच दारुबंदी जिल्ह्यात चक्क काही तरुण मंडळींकडून दारूची ‘ब्रॅडिंग’ सुरू असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून समोर आले.
हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाइलमध्ये असल्याने ते पुढे फॉरवर्डदेखील करतात. या व्हिडीओत हम सस्ती चिजों का शौक नही रखते, वर्धावाले है हम, २०० की नीप भी ३०० मे खरीदते है, असे एका युवकाने चित्रिकरण केले आहे. त्याने हा व्हिडीओ त्याच्या ‘प्रेयसी’साठी बनविला असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. मात्र, या व्हिडीओमुळे ऐतिहासिक असलेल्या वर्धा जिल्ह्याची चक्क बदनामीच करण्यात आली असल्याने अशा युवकांवर कठोर कारवाईची नितांत गरज आहे.
पहिले गाजला होता वर्ध्याचा खर्रा...
काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातून जाणाऱ्या हायवेवर चार ते पाच तरुणांनी चक्क वर्ध्याच्या खर्ऱ्यावर गीत सादर करून वर्धेकरांसाठी खर्रा किती महत्त्वाचा आहे, असे दर्शविले होते आणि आता चक्क दारूची ब्रँडिंग करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
‘सायबर सेल’ ठेवणार का ‘वॉच’
सोशल मीडियासह विविध तांत्रिक बाबींवर पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेला सायबर सेल विभाग वॉच ठेवून असतो. मात्र, सोशल मीडियावर ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या जिल्ह्याची बदनामी करणाऱ्यांवर लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून कारवाई कोण करणार, अशी चर्चा नागरिकातून सुरू आहे.