वर्धेचे सयाम वाराणशीच्या रिंगणात
By रवींद्र चांदेकर | Updated: May 11, 2024 16:31 IST2024-05-11T16:30:22+5:302024-05-11T16:31:12+5:30
Wardha : सेवानिवृत्त बँक कर्मचारी अवचितराव सयाम लढणार थेट वाराणसी लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक

Wardha's citizen to contest Lok Sabha Election in Varanasi
सेलू (वर्धा) : येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी अवचितराव सयाम यांनी थेट वाराणसी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढत आहे, हे विशेष.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होत आहे. यात अखेरच्या सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्यासाठी सेलू येथील रहिवासी असलेले अवचितराव सयाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाराणसी मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखला जातो. अवचितराव सयाम हे आदिवासी नेते म्हणून परिचित आहेत. जिल्ह्यातील सेलू येथे त्यांनी अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी २०२१ मध्ये जनसेवा गोंडवाणा पार्टीची निवडणूक आयोगात नोंदणी केली. पक्ष नोंदणीनंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवून जिंकल्या. मध्य प्रदेशातसुध्दा विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात उतरविले होते.
आता २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सयाम यांच्या पार्टीने चंद्रपूर, गडचिरोली, अकोला या मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. त्यांनी स्वत: चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून यावेळी निवडणूक लढविली. आता ते पुन्हा वाराणसी या नावाजलेल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. ते आदिवासींमध्ये समाजकार्य करीत आहेत. त्यांनी तब्बल ३१ वर्षे सेलू येथील बँक ऑफ इंडियामध्ये सेवा दिली आहे.