महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:59 IST2024-12-02T17:55:52+5:302024-12-02T17:59:43+5:30
Wardha : वर्धा स्थानकावरून सुटेल चार विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून सुविधा

Unreserved special trains will run on the occasion of Mahaparinirvana day!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मध्य रेल्वेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहे. एक विशेष ट्रेन कलबुरार्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष चार गाड्यांची सुविधा असणार आहे.
यात विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसन्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना सेवाग्राम, वर्धा, पुलगाव स्थानकावर थांबणार आहेत.
विशेष गाडी क्रमांक ०१२६२, ०१२६४ आणि ०१२६६ या विशेष साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२०४० नागपूर येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी ०१:२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता पोहोचेल. या गाड्या वर्धा, पुलगाव स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना विशेष गाडी क्रमांक ०२०४० साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे अशी आहे. नागरिकांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
वर्धा स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी
वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि विविध रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची राहणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवशी देशातील विविध प्रांतातून मुंबईत प्रचंड संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अगोदरच्या दोन-तीन दिवसांपासूनच प्रचंड गर्दी उसळते. अशात अनेक जण गावाला जाणाऱ्या किंवा गावाहून परत येणाऱ्या आपल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचतात. त्यामुळे गर्दीत भर पडून गर्दी अनियंत्रित होऊ शकते, हे ध्यानात आल्याने मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. २ डिसेंबरपासून ९ डिसेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.