वर्धा जिल्ह्यात बिकट परिस्थिती ; शेतपिके वाहून गेली, घरं ढासळली : पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा शब्द !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:01 IST2025-08-25T19:59:43+5:302025-08-25T20:01:10+5:30
अधिकाऱ्यांना दिले निर्देश : पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

Situation in Wardha district is dire; crops washed away, houses collapsed: Guardian Minister promises help!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू व वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसेच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली.
ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांनी एकत्रितरित्या पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मदनी येथील गौरव गावंडे या शेतकऱ्याच्या शेतपिकाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याची मागणी केली. राज्य शासनाने बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेमधून रस्ता लवकरच मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मदनी परिसरातील ३१ हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मदनी येथील पाहणीदरम्यान सेलूचे तहसीलदार मलीक विराणी, नायब तहसीलदार किरसान, सहायक गटविकास अधिकारी चोपडे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व गावकरी उपस्थित होते.
पंचधारा प्रकल्पाला भेट
नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पंचधारा प्रकल्पाला क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा पर्यटन स्थळाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट दिली. निसर्गसौंदर्य असलेल्या पंचधारा पर्यटन स्थळावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे पर्यटनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, रिधोराच्या सरपंच साक्षी भगत होते.
तत्काळ घरकुल मंजूर करा
आंजी येथील धाम नदीला पूर आल्याने नदीकाठावरील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करताना डॉ. पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त घरमालकांना तत्काळ घरकुल मंजूर करण्याच्या सूचना देऊन जलसंपदा विभागाने धाम नदी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीच्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर नदीच्या खोलीकरणाचे व गाळ काढण्याचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री भोयर यांनी केल्या. यावेळी तहसीलदार संदीप पुंडेकर, संदीप दाबेराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे, सुनील गफाट, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देत तत्काळ घरकुल मंजूर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.