लग्नाचे निमंत्रण व्हॉट्सॲपवर पाठ्वण्यालाच अधिक पसंती, लग्नपत्रिकेचा ट्रेण्ड पडतोय मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:23 IST2024-12-12T17:21:09+5:302024-12-12T17:23:33+5:30

अक्षता हद्दपार : वयस्कर मंडळी नाराज, तंत्रज्ञानाचा होतोय पुरस्कार

Sending wedding invitations on WhatsApp is more preferred, the trend of wedding cards is falling behind | लग्नाचे निमंत्रण व्हॉट्सॲपवर पाठ्वण्यालाच अधिक पसंती, लग्नपत्रिकेचा ट्रेण्ड पडतोय मागे

Sending wedding invitations on WhatsApp is more preferred, the trend of wedding cards is falling behind

विनोद घोडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
चिकणी (जामनी):
पूर्वी लग्नाचे निमंत्रण हे नातेवाइकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत दारात अक्षता ठेवून दिले जायचे. बदलत्या काळात याची जागा छापील लग्नपत्रिकांनी घेतली. आता तर ही लग्नपत्रिकाही ऑनलाइन झाल्याने कागदी लग्नपत्रिकांचा ट्रेण्ड मागे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र यामुळे कुटुंबातील वयस्क मंडळीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निमंत्रण ही ऑनलाइन झाले आहे. पूर्वीच्या काळी नातेवाइकांच्या घरी जाऊन गूळ खोबर देऊन लग्नाचे तसेच इतर कार्यप्रसंगाचे निमंत्रण दिले जात होते, त्यानंतर साध्या पद्धतीच्या पत्रिका छापून घरपोच घेऊन जायचे, यामध्ये सुधारणा होऊन आकर्षक व रंगीत मनमोहक पत्रिका छापून घरापर्यंत पोहोचवून दिल्या जायच्या. या निमंत्रणास नातेवाईक सन्मानाचे निमंत्रण समजत होते. यामुळे पूर्ण कुटुंबच त्या कार्यात सहभागी होत असे; पण आता ऑनलाइनचा जमाना आल्यामुळे आता निमंत्रण थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नातेवाइकांपर्यंत पोहोचविले जात आहे. ही सुविधा बहुतांश लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे; पण काही निवडक लोकांची नाराजी आहे. 


वेडिंग मार्केट झपाट्याने विस्तारत असताना ऑनलाइन निमंत्रण देण्याला चांगलेच महत्त्व आले आहे. सोशल साइटवर डिजिटल लग्नपत्रिका टाकण्याकडेही कल वाढला आहे. विशेष म्हणजे लिखित पत्रिकेऐवजी थेट दृकश्राव्य स्वरूपातील निमंत्रण तरुणाईला अधिक जवळचे वाटते. आता निमंत्रण पत्रिका छापून वाटण्याऐवजी मोबाइलवर पत्रिका पाठविण्याचा ट्रेण्ड जोरात आहे. 


पूर्वी घरोघर आणि गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वितरित करावी लागत असे. लग्नाचे दिवस जसे जवळ आले त्यात कोणाकडे निमंत्रण पत्रिका पोहोचवली नाही, याची चिंता आता मोबाइल क्रांतीमुळे मिटली. शिवाय ऑनलाईन पत्रिकात विविध प्रकार आल्याने पाहिजे तशा पद्धतीत बदल करता येतात. बदल स्विकारत असल्याने लग्नपत्रिकेचा अट्टाहास कमी झाला आहे. 


वेळ अन् पैसा दोन्हींची बचत 
धूमधडाक्यात होणाऱ्या लग्नसमारंभाचा महत्त्वाचा एक भाग म्हणजे लग्नाच्या पत्रिका छापणे आणि वाटणे. त्यासाठी खूप धावपळ करावी लागते. यात नियोजनासाठी वेळ फार कमी मिळतो. त्यात छापील पत्रिका कुटुंबीयांच्या घरोघरी नेऊन देणे शक्य होत नाही. परिणामी रुसवे-फुगवे होतात. त्यावर उपाय म्हणून सोशल मीडियावर ही पत्रिका पाठवून फोन करून कळविले जाते. त्यामुळे शेकडोत छापण्यात येणाऱ्या लग्नपत्रिका आता केवळ ५०-१०० छापल्या जात असल्याने आता ही प्रथा मागे पडू लागली आहे.

Web Title: Sending wedding invitations on WhatsApp is more preferred, the trend of wedding cards is falling behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.