Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:14 IST2019-04-03T23:26:59+5:302019-04-04T13:14:43+5:30
राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले.

Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला
देवकांत चिचाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. नियमित कर्ज भरणे हे पाप झाले, अशी भावना बसमधील प्रवासी शेतकऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पुलगाव बसस्थानकावरून लोकमतच्या प्रतिनिधीने वर्धा-जालना या बसमध्ये आपला प्रवास सुरू केला. यावेळी प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी आपल्या व्यथा सांगितल्या. वर्धा ते पुलगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुलगाव येथील येवढ्या मोठ्या गावात मागील दहा-पंधरा वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. पुलगाव येथील उड्डाण पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे. पुलगाव ते चांदुर (रेल्वे) या प्रवासादरम्यान किसना वरठी या धामणगाव तालुक्यातील शेतमजूराने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले, अशी भावना व्यक्त केली. आमला विश्वेश्वर येथील नागरिकाने कर्जमाफीचा लाभ झाला. मात्र शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे. परंतु बऱ्याच जणांना फायदा झाला नाही, अशी माहिती दिली. काही महिला प्रवाशांनी निराधाराचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले.
सुविधांकडे दुर्लक्ष
सरकारने शहर व तालुक्याच्या गावात सुविधा दिल्या. मात्र खेड्यांकडे दुर्लक्ष आहे, असे सांगितले. पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा एकाच फिल्टर प्लॅन्टवर पाणी वितरण आहे. पाणी समस्या सध्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नळही वेळेवर येत नाही, अशी माहिती दिली.
पुलगाव रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबत नाही. अनेक गाड्या येथून निघून जातात. पुलगाव मोठे गाव आहे. रेल्वेला थांबा द्यायला हवा, अशीही मागणी प्रवाशांनी केली.