निवडणूक आयोग झोपेत? मतदार यादीत दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:27 IST2025-08-19T20:26:54+5:302025-08-19T20:27:33+5:30
पत्रकार परिषदेतून शैलेश अग्रवाल यांचा आरोप : निवडणूक आयोगावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Is the Election Commission sleeping? Names of laborers from other states in the voter list
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत अनेक प्रकाराच्या त्रुटी आहेत. एकाचे नाव परंतु ईपिक नंबर वेगळे असलेले तसेच जिल्हा सोडून पुणे, नागपूर व इतर शहरांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावेसुद्धा जिल्ह्यातील मतदार यादीत आहेत, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधी शैलेश अग्रवाल यांनी स्थानिक काँग्रेसच्या सद्भावनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीची पडताळणी काँग्रेस पक्षातर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त २० टक्केच मतदार याद्या तपासल्या आहेत. त्यामध्ये हिंगणघाट शहरातील मतदार यादीमध्ये दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव आहेत. त्यामुळे या मजुराने इथे मतदान केले असेल आणि त्यांच्या गावी जाऊनसुद्धा मतदान केले असेल. ही 'वोट चोरी' नाही का, असा प्रश्नसुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला यावेळी विचाराला. तसेच देवळी, पुलगाव, हिंगणघाट येथील १८७ नागरिकांचे मतदान हे ग्रामपंचायत क्षेत्रात आहे. मात्र, त्याच नागरिकांचे मतदान पालिका क्षेत्रातसुद्धा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका या वेगवेगळ्या होत असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले नसेल का, असा प्रश्न उपस्थित करून ही 'वोट चोरी' नाही तर काय आहे? असा आरोपसुद्धा निवडणूक आयोगावर त्यांनी यावेळी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपात याद्या उपलब्ध करून द्याव्यात व मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करावे, जेणेकरून एकाच नागरिकाने दोन वेळेस मतदान केले की नाही, हे स्पष्ट होईल, असेही अग्रवाल म्हणाले.
स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नाव जिल्ह्याच्या मतदार यादीत कायमच
एकच नाव परंतु ईपिक वेगळे असलेल्या मतदारांची संख्या ४ हजार ७६५ आहे. सोबतच ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात अशा दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या ८ हजार ४९ इतकी आहे. तर वर्धा जिल्ह्यातून पुणे, नागपूर व इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या व जिथे आहेत त्या ठिकाणी व जिल्ह्यातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची संख्या १६ हजार ३८० एवढी आहे. सोबत देवळी, पुलगाव, आर्वी हिंगणघाट येथील मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांचे नाव वर्धा शहरातील मतदार यादीत आहे, असे एकूण ४ हजार ९५० मतदार आहेत.